मी दररोज दोन-तीन किलो शिव्या खातो आणि पचवतोहीः प्रधानमंत्री मोदींनी बोलून दाखवली मनातील वेदना

बागमपेठः मी दररोज दोन-तीन किलो शिव्या खातो… या शिव्याच माझ्यामध्ये ऊर्जेमध्ये बदलतात, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या मनातील ही सल तेलंगणातील एका रॅलीत बोलून दाखवली.

शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक विकास प्रकल्पाचे भूमीपूजन आणि उद्घाटन केले. आधीच्या प्रमाणेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागताला हजर राहिले नाहीत. मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के. जगमोहन रेड्डी मोदींसोबत प्रत्येक कार्यक्रमात होते. त्यांनी मोदींचे स्वागतही केले. तेलंगणात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. त्यामुळे मोदींचे तेलंगणाचे दौरेही वाढले आहेत.

 तेलंगणातील बागमपेठ येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, अनेकवेळा लोक मला विचारतात की  प्रचंड मेहनत केल्यानंतरही तुम्ही थकत का नाही?  त्यावर माझे उत्तर आहे की, मी थकत नाही कारण मी दररोज दोन-तीन किलो शिव्या खातो… ईश्वराने मला असा आशीर्वाद दिला आहे की, या शिव्या माझ्यामध्ये उर्जेत रुपांतरित होतात. मोदींना शिव्या द्या, भाजपला शिव्या द्या… परंतु जर तुम्ही तेलंगणातील लोकांना शिवी दिली तर तुम्हाला मोठी किंमत चुकती करावी लागेल, असेही मोदी म्हणाले.

 भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करताना मोदी म्हणाले की, तेलंगणातील कार्यकर्त्यांना माझे वैयक्तिक आवाहन आहे. हताशा, भय आणि अंधश्रद्धा या कारणामुळे काही लोक मोदीसाठी सगळ्यात चांगल्या शिव्यांचा वापर करतात. या चालबाजीच्या जाळ्यात अडकून तुम्ही भटकू नका, असे माझे तुम्हाला आवाहन आहे, असेही मोदी म्हणाले.

 प्रधानमंत्री मोदी यांनी अंधश्रद्धेवरही टिप्पणी केली. तेलंगणात सर्व महत्वाचे निर्णय-ज्यात मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्री म्हणून एखाद्या निवड इत्यादी अंधश्रद्धेच्या आधारावरच घेतले जातात. हा सामाजिक न्यायातील सर्वात मोठा अडथळा आहे. तेलंगणा हे माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. परंतु या आधुनिक शहरात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे. हे अत्यंत दुःखद आहे, असे सांगत मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे नाव न घेता टीका केली.

 तेलंगणाचा विकास करायचा असेल, जर तेलंगणाला मागासलेपणातून बाहेर काढायचे असेल तर आधी आम्हाला येथून अंधश्रद्धा हटवावी लागेल, असेही मोदी म्हणाले. मोदींचा हा रोख अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडेच होता. त्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर घराणेशाहीचे राजकारण आणि भ्रष्टाचाराचेही आरोप केले. ‘आधी घराणे नव्हे, आधी लोक’ म्हणणाऱ्या सरकारची गरज असल्याचे मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *