आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपये तर गट प्रवर्तकांच्या मानधनात ६ हजार २०० रुपये वाढ;  बोनसही मिळणार


मुंबई: राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत ८० हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या आशा स्वयंसेविकांना ७ हजार रुपये मानधन वाढ, ३ हजार ६६४ गट प्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रुपये मानधन वाढ आणि आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना प्रत्येकी २ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज जाहीर केले.

आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका, संघटनांचे  प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली.

या बैठकीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी  उपस्थित होते.

राज्यात सन २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. सद्य:स्थितीत राज्यात ८० हजारावर आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत.

आशा सेविकांना ५ हजार रुपये मानधन देण्यात येते. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी या मानधनात ७ हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनस्तरावरूनही ३ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता १५ हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

राज्यात ३ हजार ६६४ गट प्रवर्तक कार्यरत आहेत. गट प्रवर्तकांना ६ हजार २०० रुपये मानधन देण्यात येते. त्यामध्ये आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी आज ६ हजार २०० रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे.  

गट प्रवर्तकांना केंद्रशासनस्तरावरूनही ८ हजार ७७५ रुपये मानधन मिळत असून, त्यांना आता २१ हजार १७५ रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. 

या बैठकीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना २ हजार रुपये दिवाळी भेटही देणार असल्याची  घोषणा आरोग्य मंत्र्यांनी केली आहे.

आशा स्वयंसेविकांना मानधनवाढ व दिवाळी भेट देऊन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड केली आहे. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!