
मुंबई: एसटीच्या विश्रांतीगृहात चालक-वाहकांचे कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून देण्याबरोबरच कटिंग दाढीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली.
मुंबईतील परळ बसस्थानकामध्ये कामगार नेते भाई जगताप यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्या पुढाकाराने कर्मचारी व प्रवाशांसाठी जलशीतकाचे लोकार्पण करताना सरनाईक बोलत होते. यावेळी राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे, प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली असलेली एसटी सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची मातृसंस्था आहे. भविष्यात एसटीचे कदापि खासगीकरण होणार नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सरनाईक म्हणाले.
एसटीचा कर्मचारी अत्यंत मेहनती आहे. तो काम करीत असलेल्या ठिकाणी त्याला मुलभूत सोयीसुविधा पुरवणे ही एसटी प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे चालक-वाहक विश्रांती गृह, तेथील प्रसाधनगृह स्वच्छ असली पाहिजेत. त्यासाठी आपण लवकरच खासगी स्वच्छता संस्था नेमण्यात येणार आहे, असे सरनाईक म्हणाले.
या खासगी संस्थेकडून विश्रांती गृहाच्या स्वच्छतेबरोबर कर्मचाऱ्यांचे गणवेश स्वच्छ धुवून इस्त्री करून कर्मचाऱ्यांना देण्याबाबत व्यवस्था करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांची दाढी व केश कर्तनाची व्यवस्थादेखील स्वच्छता संस्थेच्यावतीने करण्यात येईल, असे सरनाईक म्हणाले.
कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजाकडे अशा प्रकारे लक्ष दिल्यास कर्मचाऱ्यांसाठी कामगिरी करणाऱ्यांसाठी अनुकूल मानसिक परिस्थिती निर्माण करणे शक्य होते. अर्थात, याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये होऊन त्यांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असे सरनाईक यांनी सांगितले.
