विरोधकांचा छळ आणि दहशत निर्माण करण्यासाठीच ईडी-सीबीआयचा गैरवापरः काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरोप

नांदेडः केवळ विरोधी पक्षातील लोकांचा छळ करण्यासाठी आणि त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, ईडीसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रातील भाजप सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या परिक्रमेदरम्यानची पहिली सभा आज नांदेड येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

 केंद्रातील भाजप सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या अनेकांना ईडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा त्रास होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही त्याचीच किंमत मोजली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावरही याच पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर केला जात असल्याबद्दल वारंवार आवाज उठवला. संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीच्या कार्यपद्धतीवर गंभीर स्वरुपाचे ताशेरे ओढले आहेत. मोदी सरकार के दोन भाई, ईडी और सीबीआई, असे जयराम रमेश म्हणाले.

हेही वाचाः न्याय व्यवस्थेलाही अंकीत करण्याचे प्रयत्नः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे. हा दबदबा मोडून काढण्यासाठी भाजपने केंद्र सरकारमध्ये सहकार खाते निर्माण केले आणि त्या खात्याचा कार्यभार केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सोपवला. सहकार क्षेत्र मोडित काढण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले. महाराष्ट्रात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकासाची विविध कामे झाली आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात सहकार क्षेत्रावर कर आकारला जात नव्हता. परंतु सध्याच्या मोदी सरकारने सहकार क्षेत्रावरही कर लादला आहे. साखर निर्यातीची मर्यादा कमी केली आहे. सहकार क्षेत्र संपवण्यासाठीच हे सर्व केले जात आहे, असा आरोपही जयराम रमेश यांनी केला.

भारत जोडो यात्रा गंगा नदीसारखीः भारत जोडो यात्रा गुजरात हिमाचल प्रदेश या निवडणुका असलेल्या राज्यांतून जात नाही. महाराष्ट्रातही फक्त पाचच जिल्ह्यांतून ही यात्रा जात आहे. इतर राज्यांत ही पदयात्रा का जात नाही, असे प्रश्न विचारले जात आहेत. परंतु कन्याकुमारी ते काश्मीर ही भारताची उत्तर-दक्षिण अशी दोन ध्रुवे आहेत. ही पदयात्रा भारताचे दोन ध्रुव जोडणारी आहे. गंगा नदीसारखी ही पदयात्रा मुख्य यात्रा आहे. निवडणुकीचे वेळापत्रक आणि पदयात्रेचे वेळापत्रक याचा ताळमेळ बसवणेही शक्य नाही, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

तज्ज्ञांशी चर्चा करूनच यात्रेचा मार्ग निवडलाः निवडणुकीच्या काळात भारत जोडो यात्रा हिमाचल प्रदेश किंवा गुजरातमधून गेली तर पक्ष आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पदयात्रेतच व्यस्त राहिले असते. भारत जोडो पदयात्रेचा मार्ग विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करूनच निश्चित करण्यात आला आहे. सुरक्षेसंबंधीच्या काही प्रश्नांचा विचारही भारत जोडो पदयात्रेचा मार्ग निश्चित करताना करण्यात आला आहे, असे जयराम रमेश म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!