‘भरलेले कान’ पिळले जाताच विद्यापीठातील दोन कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या तडकाफडकी खंडित केलेल्या सेवा पुन्हा बहाल!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही ‘बोगस’ प्राध्यापकांनी प्रभावशाली जातीचे कार्ड वापर लॉबिंग करत वरिष्ठांचे कान भरल्यामुळे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या आदेशाने अर्थशास्त्र विभागातील दोन कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या तडकाफडकी खंडित करण्यात आलेल्या सेवा उच्चपदस्थांकडून कान पिळले जाताच गुरूवारी पुन्हा बहाल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या कामकाजाच्या पद्धतीवरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांत ३२ हजार रुपये प्रतिमहा एकत्रित वेतनावर कंत्राटी तत्वावर ११ महिन्यांसाठी सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.  त्यात अर्थशास्त्र विभागातील डॉ. बाळा आसाराम सराटे आणि पद्मश्री सचिन पाटील या दोन कंत्राटी सहायक प्राध्यापकांचाही समावेश होता. कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व सहायक प्राध्यापकांना सात दिवसांचा सेवाखंड देऊन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या एका सत्रासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय २५ जुलै २०२५ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार इतर कंत्राटी सहायक प्राध्यापकांप्रमाणेच सराटे व पाटील हे सात दिवसांचा सेवाखंड घेऊन ७ ऑगस्ट २०२५ रोजी अर्थशास्त्र विभागात पुन्हा रूजू झाले.

दरम्यान घोटाळे करून मिळवलेल्या मूळ नियुक्त्याच बोगस असलेल्या अर्थशास्त्र विभागातील काही ‘कृति’वंत प्राध्यापकांनी प्रभावशाली जातीचे  कार्ड वापरत या दोन कंत्राटी सहायक प्राध्यापकांविरुद्ध लॉबिंग सुरू केले. अर्थशास्त्र विभागात कार्यभारच नाही. आम्हालाच कार्यभार उरत नाही तर या कंत्राटी सहायक प्राध्यापकांची अर्थशास्त्र विभागात गरज नाही, असे रडगाणे गात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांचे कान भरले. या कान भरो मोहिमेत  या ‘कृति’वंत बोगस प्राध्यापकांचे ‘खंदे’ समर्थकही सहभागी होते. या बोगस प्राध्यापकांनी संघटितपणे केलेले लॉबिंग आणि कान भरणीमुळे ‘विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार शैक्षणिक कार्यभारानुसार अर्थशास्त्र विभागात या दोन कंत्राटी सहायक प्राध्यापकांची आवश्यकता नसल्याचे दिसून आल्याचे’ कारण देत कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या आदेशान्वये ४ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. सराटे व पाटील यांच्या एकत्रित वेतनावरील कंत्राटी सेवा संपुष्टात आणण्यात आल्या होत्या.

या दोन कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या सेवा संपुष्टात आणण्यात आल्यामुळे लॉबिंग करून हा सगळा प्रकार घडवून आणलेले बोगस प्राध्यापक मनातल्या मनात लड्डू-जिलेबी खात असतानाच हे प्रकरण चांगलेच पेटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएसएसचे काही ज्येष्ठ पदाधिकारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर त्यांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळे दिवाळीच्या फराळाचा गोडवा संपण्याच्या आतच कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना तडकाफडकी सेवा खंडित केलेल्या या दोन कंत्राटी सहायक प्राध्यापकांना अर्थशास्त्र विभागात पुन्हा रूजू करून घेण्याचे आदेश ६ नोव्हेंबर रोजी काढावे लागले आणि हे दोन्ही कंत्राटी सहायक प्राध्यापक ६ नोव्हेंबर रोजीच अर्थशास्त्र विभागात रूजूही झाले.

कल्टाकल्टीचाच ‘कार्य’भार

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जेव्हा विविध विभागात कंत्राटी तत्वावर सहायक प्राध्यापकांचा निर्णय झाला तेव्हा प्रत्येक विभागाकडून कार्यभारानुसार आवश्यक असलेल्या सहायक प्राध्यापकांचा तपशील मागवण्यात आला होता. त्यानुसारच अर्थशास्त्र विभागात या दोन सहायक प्राध्यापकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. मग २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच सत्रात अर्थशास्त्र विभागातील कार्यभार अचानक कमी कसा झाला? विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अर्थशास्त्र विभागात कार्यभारच नसल्याचा साक्षात्कार कुलगुरू डॉ. विजय फुलारींना कसा झाला? मग जर यूजीसीच्या नियमानुसार कार्यभारच बसत नव्हता तर आता तो कसा बसला? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात असून कुलगुरू डॉ. फुलारींच्या कार्य पद्धतीवरच शंका घेण्यात येऊ लागली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!