
किनवटः षट्टतीला एकादशीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर येथे भरलेल्या ठाकूर बुवाच्या यात्रेत भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यामुळे ५० हून अधिक भाविकांना विषबाधा झाली असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी पहाटे घडलेल्या या विषबाधेच्या या घटनेमुळे माहूर परिसरात खळबळ उडाली आहे.
माहूर येथे दरवर्षी षट्टतीला एकादशीनिमित्त ठाकूर बुवाची यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून अनेक पायी दिंड्या माहूर येथे येतात. या दिंड्या मोकळ्या जागेत तसेच विविध मठ आणि मंदिर परिसरात तात्पुरत्या राहुट्या उभारून थांबतात.
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील जवळा (बु) येथील दिंडी शनिवारी (२५ जानेवारी) देवदेवेश्वर मंदिर परिसरात दाखल झाली होती. या दिंडीतील भाविकांनी दिवसभर देवदर्शन केले आणि रात्री भगर व शेंगदाण्याची आमटी खाल्ली होती. रात्री २ वाजेच्या सुमारास काही भाविकांना मळमळ आणि उलट्याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर अनेकांना असाच त्रास सुरू झाला.
मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागलेल्या भाविकांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी पहाटेपर्यंत मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागालेल्या भाविकांची संख्या वाढून ५२ पर्यंत पोहोचली.
विषबाधा झालेल्या भाविकांपैकी ४ भाविकांची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित सर्व भाविकांची प्रकृती चांगली असून आज सायंकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार असल्याची माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
