सोलापूरः ‘विरोधक आमच्या पोरांना बाळ म्हणत्यात. पण यांना माहिती आहे का पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच तुमच्या एवढी बाळ असत्यात,’ असे वादग्रस्त वक्तव्य सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी केले आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.
मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजन पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच उमेश पाटील तर भाजपचे धनंजय महाडिक यांच्या विरोधात भाजपचेच प्रशांत परिचारक निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत.
उद्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत प्रचार करताना भाषा आणि भाषणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जात आहेत. मोहोळ तालुक्यातील एका प्रचारसभेत भाषण करताना राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आणि त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. विरोधक आमच्या पोरांना बाळ म्हणत्यात… यांना माहीत आहे का पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच तुमच्या एवढी बाळ असत्यात…. असे वादग्रस्त विधान राजन पाटील यांनी केले.
राजन पाटील हे मोहोळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. राष्ट्रवादीचा हुकमी एक्का म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. सोलापूरच्या ग्रामीण राजकारणात राजन पाटील यांचा मोठा दबदबा असून त्यांना बाळराजे पाटील आणि विक्रांतराजे पाटील अशी दोन मुले आहेत. राजन पाटील यांची ही दोन्ही मुले सोलापूरच्या राजकारणात सक्रीय होत असून सिंकदर टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटलांची ही दोन्ही मुले प्रचार करत आहेत.
भीमा सहकारी साखर कारखान्याची सत्ता खेचून आणण्यासाठी या निवडणुकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांनी भाजपचे प्रशांत परिचारक यांना बळ दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच राजन पाटलांच्या मुलाला विरोधकांनी बाळ असे म्हटले होते. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचारसभेत बोलताना ‘बाळांनो असे बोलू नका…’ असे म्हटले होते. त्याला उत्तर देताना सिकंदर टाकळी येथील प्रचारसभेत राजन पाटलांची जीभ घसरली आणि ते भलतेसलते बोलून गेले.
‘पाटलांच्या पोरांना बाळ म्हणत्यात…. यांना माहीत आहे का पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच तुमच्या एवढी बाळ असत्यात…. वयाच्या १७ व्या वर्षी ३०२ कलमं भोगणारी पोरं आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे’, असे राजन पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल’: राजन पाटील यांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजन पाटलांचे हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे. स्वतःच्या पोरांना लग्नाआधीच पोरं झाली आहेत, असे सांगणारा असंस्कृत विकृत माणूस भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? राजन पाटील यांच्यासारखा घाणेरडा नेता मोहोळ तालुक्याचा तीनवेळा आमदार झाला. याची आम्हाला लाज वाटते. पाटील म्हणून घ्यायचीही लाज वाटेल, असे टिकास्त्र उमेश पाटील यांनी सोडले आहे.