
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): व्यवस्थेविरुद्ध देशातील तरूणाईच्या संतापाचा आवाज बनत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक/संयोजक अभिजीत दिपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येऊ लागल्या आहेत. खुद्द अभिजीतनेच एक्सवर (ट्विटर) धमकीच्या मेसेजचा स्कीनशॉट शेअर करत ही माहिती दिली. त्यामुळे अभिजीत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली आहे.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीच्या वेळी देशातील बेरोजगार तरूणांची तुलना कॉक्रोच (झुरळ) आणि पॅरासाईटशी (परजीवी) केल्यामुळे देशभरातील तरूणाईत निर्माण झालेल्या संतापाचे प्रतिक म्हणून अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी या अनोख्या आणि देशातील सर्वात मोठ्या डिजिटल राजकीय व्यंगात्मक चळवळीची स्थापना केली. अवघ्या आठवडाभरातच कॉक्रोच जनता पार्टीने देशातील सत्ताधारी भाजपसह प्रमुख राजकीय पक्षांनाही मागे टाकत इंस्टाग्रामवर २०. २ मिलीयन (२ कोटी २ लाख) फॉलोअर्स मिळवले. त्यामुळे देशातील प्रमुख राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहे.
देशात वाऱ्यासारख्या पसरत चाललेल्या आणि अनेक सेलिब्रेटींसह नामांकित व्यक्तींचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक/संयोजक अभिजीत दिपके यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. स्वतः अभिजीत दिपके यांनीच एक्सवर (ट्विटर) धमकीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत ‘Receiving teath threats now’ (आता जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत) असे म्हटले आहे. अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केल्यानंतर गेल्या काही दिवसांत मांडलेल्या भूमिका आणि शेअर केलेल्या पोस्टमुळे त्यांना लक्ष्य केले जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय म्हटलेय धमकीच्या मेसेजमध्ये?
अभिजीत दिपके यांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून धमकी देण्यात आली आहे. ‘हाय सुन…. पेसा मिलेगा तुझे ये अकाऊंट बंद करदे वरना बीजेपी में आ… वरना अमेरिका मे भी मरवा देंगे तुझे…’ असे इंग्रजी लिपीत टाइप केलेल्या या हिंदी संदेशात म्हटले आहे. दुसराही एक धमकीचा मेसेज अभिजीत दिपकेंना मिळाला आहे. त्यात ‘अभी तो नंबर मिला है… तेरा घर मिलने में देर नही हैं… कहां रहेता है इंडिया मे ही ना?’ अशी धमकी या दुसऱ्या संदेशात देण्यात आली आहे.
नेटकरी संतप्त, आता सायबर पोलिसांकडे लक्ष
अभिजीत दिपकेंनी जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याबद्दलची माहिती सोशल मीडियावर दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स आणि नेटिझन्सची तीव्र संताप व्यक्त केला आहे. वैचारिक मतभेदांमधून थेट जीवे मारण्याची धमकी देणे अत्यंत चिंताजनक असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करत या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे.
अभिजीत दिपकेंना धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात तातडीने सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करावा आणि अभिजीत दिपके यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. आता सायबर पोलिस या प्रकरणी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अभिजीतच्या आईवडिलांना अटकेची भीती
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्यात असलेले अभिजीतचे वडिल भगवानराव दिपके आणि आई अनिता दिपके यांना अभिजीतला अटक केली जाण्याची भीती वाटू लागली आहे. अभिजीतच्या आईवडिलांची मराठी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली आणि त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या दोघांनीही ही भीती बोलून दाखवली.
अभिजीतने राजकारणात पडायला नको, असे मला वाटते. त्याने चांगले शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षा देऊन एखादा अधिकारी व्हावे, अशी माझी इच्छा होती. राजकारण आमचा पिंड नाही. माझ्या ३५ वर्षांच्या नोकरीच्या काळात राजकारण्यांचा अनेकवेळा संबंध आला, मात्र मी कुणाच्याही जवळ गेलो नाही, असे भगवानराव दिपके म्हणाले. तुम्हाला अभिजीतबद्दल भीती आणि चिंता वाटते काय? असे विचारले असता, त्याच्या अकाऊंटचे कितीही फॉलोअर्स असले तरीही सध्याचे जे राजकारण आपण पाहतो, त्यामुळे भीती वाटणे स्वाभाविकच आहे. भारतात आल्यानंतर त्याला अटक होण्याची भीती आम्हाला वाटते. आम्ही वृत्तपत्रात अशा काही घटना वाचल्या आहेत, असे भगवान दिपके म्हणाले.
अभिजीत हा आमचा एकुलता एक मुलगा आहे. आम्हाला त्याची काळजी वाटते. वर्तमानपत्रात आम्ही वाचतो की, राजकारणाशी संबंधित लोकांना अटक करतात. तो एक-दोन वर्षापासून अमेरिकेत असल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. पण आता तो भारतात परतला तर त्याला उचलतील की या? अशी भीती वाटते. आमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती राजकारणात नाही. त्याने राजकारणापासून दूर रहावे. आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे आणि त्याने घरी सुरक्षित परतावे, असे आई म्हणून मला मनोमन वाटते, असे अनिता दिपके म्हणाल्या.

