
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ‘काही बेरोजगार तरूण झुरळासारखे आहेत’ असे वक्तव्य केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या तरूणाने स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) देशभरात धुमाकुळ घातला असून अवघ्या चार दिवसातच या आभासी सीजेपीने फॉलोअर्सच्या बाबतीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीलाही (बीजेपी) मागे टाकले आहे. दरम्यान देशातील तरूणाईबरोबरच सेलिब्रेटींमध्येही सीजेपी क्रेझ वाढू लागल्यानंतर या आभासी राजकीय व्यंगात्मक चळवळीची डिजिटल मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून सीजेपीचे एक्स (ट्विटर) हँडल बंद करण्यात आले असून इंस्टाग्राम अकाऊंटही हॅक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
१५ मे २०२६ रोजी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान कथितरित्या बनावट पदव्या घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर व्यवस्था विस्कळित करणाऱ्या बेरोजगार तरूणांची तुलना कॉक्रोच (झुरळ) आणि समाजातील परजीवी अशी केली होती. आपले वक्तव्य केवळ बनावट पदवीधारकांसाठी होते, बोरेजगार तरूणांसाठी नाही, असे स्पष्टीकरण न्या. सूर्यकांत यांनी नंतर दिले खरे परंतु तोपर्यंत सोशल मीडियावर तरूणांचा संताप अनावर झाला होता.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरचा रहिवाशी असलेल्या आणि सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये वास्तव्यास असलेल्या अभिजीत भगवानराव दीपके या तरूणाने देशातील तरूणाईचा हा अपमान धारदार राजकीय व्यंगात्मक चळवळीत रूपांतरित करण्याचे ठरवले आणि त्याने १६ मे २०२६ रोजी एक्सवर (ट्विटर) एक गुगल फॉर्म शेअर करत ‘कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)’ या आभासी राजकीय व्यंगात्मक चळवळीची स्थापना केली आणि पाहता पाहता सीजेपी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.
१७ मे २०२६ रोजी कॉक्रोच जनता पार्टीचे इंस्टाग्राम हँडल सुरू झाले. अवघ्या चारच दिवसात सीजेपीने सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसलाही इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकले. सत्ताधारी बीजेपीचे इंस्टाग्रामवर ८.८ मिलियन (८८ लाख) फॉलोअर्स आहेत. तर अवघ्या चारच दिवसात बीजेपीला मागे टाकत सीजेपीने १४.६ मिलियनहून (१ कोटी ४६ लाख) अधिक फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. इंस्टाग्रामवर काँग्रेसचे १३.३ मिलियन (१ कोटी ३३ लाख) फॉलोअर्स आहेत.
सीजेपीच्या इंस्टाग्राम हँडलवर अवघ्या ६० पोस्ट आहेत. तर भाजपने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर १८ हजार ४०० पोस्ट शेअर केलेल्या आहेत तर काँग्रेसने ३९ हजार ८०० पोस्ट शेअर केलेल्या आहेत. कॉक्रोच (झुरळ) हे अत्यंत कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याचे प्रतीक आहे. त्यामुळे तरूणांचा हा संताप डिजिटल युगात एक नवा इतिहास रचत आहे. कॉक्रोच जनता पार्टी ही केवळ एक थट्टा नसून तो देशातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांचा, पेपर लीकमुळे त्रस्त झालेल्या जेन-झी (Gen-Z) पिढीचा आणि व्यवस्थेकडून दुर्लक्षित राहिलेल्या घटकांचा आवाज आहे, असे सीजेपीचा संस्थापक आणि संयोजक अभिजीत दिपके सांगतो.
हा राग पूर्ण सिस्टिमविरोधात!
“पूर्ण सिस्टिमविरोधात हा राग आहे. आज भाजप आहे. उद्या दुसरे पक्ष असतील. जर हे पक्ष देशातल्या संस्थांचे सार्वभौमत्व सुरक्षित ठेवू शकत नसतील तर लोकशाही कशी टिकेल? आपल्या देशात नेमके काय चाललेय? लोकशाही कुठेच अशी चालत नाही. मतदार सरकार निवडत असतात, पण आपल्याकडे सरकारच ठरवतेय की मतदान कोण करणार?”
–अभिजीत दिपके, माध्यमांसमोर सीजेपीची भूमिका मांडताना.
सेलिब्रेटीही सीजेपीच्या प्रेमात!
अभिजीत दिपकेच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या सीजेपीने देशातील तरूणाईच्या मनावर गारूड करत देशभर धुमाकुळ घालायला सुरूवात केली. या डिजिटल राजकीय व्यंगात्मक आंदोलनात देशातील सर्वसामान्य तरूणांबरोबरच बॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रेटी, दिग्दर्शक, राजकीय नेते, नामांकित वकील आणि सामाजिक कार्यकर्तेही सामील झाले आहेत. महुआ मोईत्रा, किर्ती आझाद, प्रशांत भूषण यासारख्या प्रमुख राजकीय नेत्यांनी सीजेपीला सोशल मीडियावर पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री दिया मिर्झा, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, उर्फी जावेद, ईशा गुप्ता, हिमांशी खुराणा, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी इंस्टाग्रामवर सीजेपीला फॉलो केले आहे. सेलिब्रेटी आणि नामांकित व्यक्तींमध्येही सोशल मीडियावर सीजेपीची क्रेझ वाढतच चालली आहे.
आता डिजिटल मुस्कटदाबीचे प्रयत्न
अवघ्या चार दिवसांतच सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स कमावणाऱ्या सीजेपीची डिजिटल मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया हँडल बॅन केले जाऊ शकतात, अशी भीती अभिजीत दिपके या तरूणाने एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली होती. त्यानंतर तासाभरातच सीजेपीचे एक्सवरील (ट्विटर) हँडल बंद करण्यात आले असून त्यावरचा मजकूर पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर वारंवार पासवर्ड रिसेटचे पॉपअप येत आहेत. अकाऊंट हॅक करण्याचा हा प्रयत्न आहे. सोशल मीडियावर आमची लोकप्रियता त्यांच्यापेक्षा जास्त वाढली आहे. जर हॅकिंग नाही जमलं तर ते आमचे अकाऊंट बॅन करतील. महिनाभरापूर्वीही त्यांनी हेच केले होते. आम्ही काय करतोय याकडे आयबी आणि इतर संस्था लक्ष ठेवून आहेत, असे आम्हाला कळले आहे, असे अभिजीत म्हणाला होता. त्यानंतर तासाभरातच सीजेपीचे एक्स (ट्विटर) हँडल बंद करण्यात आले. त्यानंतर एक्सवर Cockroach is Back (@Cockroachisback ) नावाने एक्सवर नवीन हँडल सुरू करण्यात आले.
कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स हँडल बंद करण्यात आल्यानंतर इंस्टाग्रामवरील हँडलही हँक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा अभिजीत दिपकेने एक्सवर स्क्रीनशॉट शेअर करत केला आहे. सीजेपीच्या इंस्टाग्राम हँडलवरही पासवर्ड रिसेटचे पॉपअप येत असल्याचे अभिजीतने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ही कुठली लोकशाही?
“ज्याची भीती होती तेच झाले. आधी त्यांनी आमचे अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही तर त्यांनी भारतात कॉक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट बॅन केले आहे. लोकांनी तिकडे विचारायला हवे की हे अकाऊंट बॅन का केले? आम्ही चुकीचे बोललो नव्हतो. आम्ही फक्त मंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याची जबाबदारी निश्चित व्हावी, अशी आमची मागणी होती. त्यावर त्यांनी आमचे अकाऊंटच बंद केले. ही कुठली लोकशाही?”
–अभिजीत दिपके, सीजेपीचे एक्स अकाऊंट बॅन केल्यानंतर.

