मुख्यमंत्री शिंदे नागपूर दौरा अर्धवट सोडून तडकाफडकी मुंबईला रवाना, महाराष्ट्रात पुन्हा एका राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण!


नागपूर/मुंबईः  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नियोजित नागपूर दौरा अर्ध्यावरच सोडून तडकाफडकी मुंबईला रवाना झाले आहेत. मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या शिवसेना(शिंदेगट) आमदारांच्या तोंडचे पाणी पळवत राष्ट्रवादीचे अजित पवार हे सरकारमध्ये  सामील झाले आणि उपमुख्यमंत्रिपदासह त्यांनी आठ मंत्रिपदेही मिळवली. त्यामुळे स्वपक्षीयात निर्माण झालेली नाराजी आणि मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी मुंबईला रवाना होण्याचा निर्णय या दोन गोष्टींना जोडून राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जाऊ लागली आहे.

 राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या नागपूर आणि गडचिरोली दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यासाठी आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नागपुरात त्यांचे आगमन झाले. राजशिष्टाचाराप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना राजभवनात सोडले आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे तडकाफडकी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

 राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर द्रौपदी मुर्मू या पहिल्यांदाच विदर्भ दौऱ्यावर आल्या आहेत. उद्या बुधवारी सकाळी गडचिरोलीतील गोंडवना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आणि कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाला राष्ट्रपती मुर्मू उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपती मुर्मू यांना राजभवनात सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे नागपुरातच थांबणार होते. गडचिरोली आणि नागपुरातील राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातही ते उपस्थित राहणार होते. परंतु राष्ट्रपतींना राजभवनात सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे तडकाफडकी मुंबईच्या दिशेने  रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होत आठ आमदारांसह शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. शिंदे- फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाल्यामुळे सरकारमधील शिंदे गटाचे महत्वच संपले, अशी भावना शिवसेनेच्या शिंदे गटात निर्माण झाली आहे. शिवसेनेकडील महत्वाची खातीही अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यताही बोलून दाखवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गट कमालीचा नाराज झाला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार बहुमतामध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सरकारमध्ये घ्यायची काय गरज होती? असा थेट सवाल शिंदे गटातील आमदार मुख्यमंत्री शिंदेंना विचारू लागले आहेत. याच मुद्यावरून शिंदे गटातील आमदार आक्रमक झाले आहेत. या नाराजीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी एकट्यातच सुमारे अर्धातास चर्चा केली होती. पण त्यातून काही मार्ग पुढे आला नाही.

नाराज झालेले हे आमदार ‘वेगळा’ विचार करण्याच्या तयारीत असल्याची कानगुण लागताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर दौरा अर्धवट सोडून तडकाफडकी मुंबईला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता मुख्यमंत्री शिंदे नाराज आमदारांची समजूत काढण्यात यशस्वी होतात की थेट राजभवन गाठतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आमदारांची नाराजी थोपवता आली नाही तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, असे राजकीय जाणकारांना वाटते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!