मुंबईः बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या पोलिस एन्काऊंटरची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, अक्षय शिंदेला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने चकमकीत ठार केल्यानंतर आता त्याच्या विरोधात पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील पूर्वप्राथमिक वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुरड्या विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात १२ ऑगस्ट २०२४ रोजी लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शाळेचा सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली होती. परंतु शाळेत घडलेला लैंगिक अत्याचार, हे अत्याचाराचे प्रकरण दडपून टाकण्यासाठी झालेले प्रयत्न आणि पोलिसांनी केलेली टाळाटाळ यामुळे बदलापूरसह राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
बदलापूरसह राज्यभर उसळलेल्या जनक्षोभानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमली. एसआयटीच्या पथकाने तपास करून अक्षय शिंदेवर न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. परंतु अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाठी ठाणे पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक सोमवारी अक्षयला तळोजा तुरुंगातून तपासासाठी घेऊन जात असतानाच पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत अक्षय शिंदे ठार झाला.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून राज्याचे वातावरण तापले आहे. या एन्काऊंटरची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. अशातच आता या एन्काऊंटरचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभाग (सीआयडी) करणार असल्याचे वृत्त आले आहे. ठाणे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, न्यायदंडाधिकारी, राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) या घटनेची माहिती देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. या घटनेचा तपास सीआयडी करणार असून सोबत न्यायालयीन चौकशीही केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अक्षयवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
दरम्यान, ठाणे पोलिसांनी अक्षय शिंदेच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर चकमकीनंतर अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात अक्षयविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २६२, १३२,१२१ तसे शस्त्र अधिनियमाचे कलम २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ठाण्याचे सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
‘आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही…‘
अक्षय शिंदे याने बंदूक खेचल्यानंतर पोलिसांच्या दिशेने बंदूक रोखून ‘आता आपण कोणालाही जिवंत सोडणार नाही, असे म्हणत पोलिसांवर गोळीबार केला. गोळी झाडण्यापूर्वी तो वारंवार पोलिसांना शिवीगाळ करून मला कशासाठी घेऊन जात आहात? मी आता काय केले आहे?, असे म्हणत होता. त्याने पोलिसांवर दोन गोळ्या झाडल्या. अक्षय शिंदेची उद्विग्न देगबोली पाहून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या पिस्तुलातून एक गोळी अक्षय शिंदेच्या दिशेने झाडली. त्यात जखमी होऊन अक्षय खाली पडला,’ असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.
‘पोलिसांसमोर त्याची हिंमत होतेच कशी?’
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘त्या नराधमाला फाशी मिळावी अशी माझी मागणी होती. त्याला भर चौकात सर्वांसमोर फाशी द्यावी, अशी आमची मागणी होती. मात्र कालची घटना घडली त्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. त्याचा मृत्यू ही वेगळी घटना आहे. मात्र गुन्हेगार हात बांधलेले असताना गोळी चालवतोच कसा? एवढ्या पोलिसांसमोर त्याची हिंमत होतेच कशी? याचे उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावे,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘कोणला वाचवण्यासाठी अक्षयचा बळी घेतला का?’
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. अक्षय शिंदे या आरोपीला पोलिस कशाच्या शोधासाठी घेऊन जात होते? कोणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला का? पोलिसाला लागलेली गोळी मांडीला लागली आहे, अशी माहिती समोर येत आहे. मग याबाबतचे मेडिकल रिपोर्टही समोर यायला हवेत. गोळीबार करणारा व्यक्ती समोरासमोर गोळीबार करतो. मग ती गोळी मांडीत कशी लागली? असे अनेक प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत.