उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे, हायकोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी स्पष्ट केली भूमिका


मुंबईः बदलापूर येथील शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवला असून कोणत्याही राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असे म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी हा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तर मविआचे नेते व कार्यकर्ते गावात आणि शहरात तोंडाला काळीपट्टी बांधून बसतील, अशी घोषणा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आम्ही बंद करणार नाही, पण जनतेने बंद केल्यास आमचा संबंध असणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

महाविकास आघाडीच्या उद्याच्या (२४ ऑगस्ट) बंदच्या विरोधात बकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेतली.

अशा प्रकारे बंद पुकारणे बेकायदेशीर असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. कोणत्याही राजाकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, अशी टिप्पणीही उच्च न्यायालयाने केली आहे.

बदलापूर तसेच राज्यात अन्य ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा असून हा बंद राजकारणासाठी नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. या बंद दरम्यान राज्यातील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले होते. परंतु उच्च न्यायालयाने हा बंदच बेकायदेशीर ठरवल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दणका बसला आहे.

बंद मागे घ्याः शरद पवार

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. ‘बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरातून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबींकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता,’ असे शरद पवारांनी म्हटले आहे.

हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापित उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येते, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

आम्ही बंद करणार नाही, पण… काँग्रेसची भूमिका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर पक्षाची भूमिका मांडली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून आम्ही उद्या काळे झेंडे घेऊन आणि तोंडाला काळीपट्टी बांधून उद्या सकाळी ११ वाजता आंदोलन नाही, पण आम्ही एकत्र बसू. यामध्ये आम्ही न्यायालयाचा आदर करू. याबाबतच्या सूचना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात दिल्या आहेत. न्यायालयाने जो आदेश दिला, त्या निर्णयाचा विरोध करण्याचे काहीही कारण नाही. आम्ही बंद करणार नाही, पण जनतेने बंद केल्यास त्याच्याशी आमचा संबंध असणार नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.

तोंडाला काळीपट्टी बांधून बसूः ठाकरे

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. ज्या तत्परतेने बंदवर निर्णय घेतला, तीच तत्परता गुन्हेगारांना शिक्षा देताना दाखवा. या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, पण त्यात वेळ जाऊ शकतो. न्यायालयात अपील करण्याची ही वेळ नाही. उद्या मातोश्रीजवळच्या चौकात तोंडाला काळीपट्टी बांधून आम्ही बसणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवारांनी आवाहन केले आहे. आता आम्हीही बंद मागे घेत आहोत. पण गावात आणि शहरातील मुख्य चौकात आघाडीचे नेते-कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती लावून निषेध करतील. आम्ही आमचं तोंड बंद करू. कारण देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?,  मोर्चे व हडताळ यावर बंदी आहे का? लोकांनी भावना व्यक्त नये का? यावर घटनातज्ज्ञांनी बोलले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!