बोगस पदव्यांच्या रॅकेटची व्याप्ती मराठवाडाभर?: वाराणसीतील विद्यापीठाच्या बोगस पदव्यांवर आणखी एका महाभागाने मिळवला पीएचडीला प्रवेश!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पुणे आणि कोल्हापुरातील विद्यापीठांचे नाव व लोगो वापरून बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश आणि कनिष्ठ महाविद्यालयात सहशिक्षकाची नोकरी मिळवल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका महाभागाने वाराणसीतील महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून तयार केलेल्या बनावट व खोट्या पदव्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मराठवाड्यात बोगस पदव्यांचे मोठे रॅकेटच असण्याची शक्यता बळावली असून आणखी किती जणांनी अशा पदव्यांवर पीएच.डी.ला प्रवेश मिळवले आणि किती जणांनी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात नोकऱ्या मिळवल्या? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आस्मा इद्रिस खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान या दोघांनी पुण्याच्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून एम.फिल.च्या बनावट व खोट्या पदव्या तयार करून त्या पदव्यांच्या आधारे सन २०२१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेतून सूट मिळवून इंग्रजी आणि हिंदी विषयात पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात २६ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान  यांची डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिल पदवीही बोगस!

कोल्हापूर विद्यापीठाच्या बनावट व खोट्या पदव्या तयार करून शेख मोहम्मद हाफीज उर रहेमान याने खुलताबादच्या कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ सहशिक्षकाची नोकरी मिळवल्याचेही उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी खुलताबादच्या कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील १२ प्राध्यापकांच्या संशयास्पद पदव्यांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित विद्यापीठांकडून या प्राध्यापकांच्या पदव्यांचे पडताळणी अहवाल येणे बाकी आहे.

हेही वाचाः डीपीयूच्या बोगस एमफिलवरच ‘पेट’ला कट मारून आस्मा व मकसूद खानने घेतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात पीएचडीला प्रवेश!

१२ प्राध्यापकांच्या पदव्यांच्या पडताळणी अहवालाची प्रतीक्षा असतानाच कोहिनूर महाविद्यालयाशीच संबंधित असलेल्या सिद्दीकी मोहम्मद शोएब हबीबोद्दीन या महाभागानेही उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या बी.एस्सी. आणि एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या बनावट व खोट्या पदव्या तयार करून सन २०२१ मध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पीएच.डी. नोंदणी प्रक्रियेत सहभाग घेऊन पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचाः ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खानविरुद्ध बेगमपुरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, पीएचडीचे प्रवेशही रद्द करणार

सिद्दीकी मोहम्मद शोएब हबीबोद्दीनने महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या सन २०१० ते २०१३ दरम्यानच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाच्या गुणपत्रिका आणि सन २०१४ चे पदवी प्रमाणपत्र तसेच सन २०१३ ते २०१५ या कालावधीतील एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या गुणपत्रिका आणि सन २०१६ चे पदवी प्रमाणपत्र तयार केले आणि त्याच बनावट व खोट्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०२१ मध्ये पीएच.डी.ला प्रवेश मिळवला.

हेही वाचाः उच्च शिक्षणमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये बोगस प्रवेश दाखवून तयार केल्या शिवाजी विद्यापीठाच्या बनावट पदव्या आणि कोहिनूर महाविद्यालयात मिळवली नोकरी!

सिद्दीकी मोहम्मद शोएब हबीबोद्दीनकडे असलेल्या बी.एस्सी. आणि एम.एस्सी. पदव्या संशयास्पद असल्यामुळे रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी वाराणसीच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए.के. त्यागी, कुलसचिव डॉ. सुनिता पाण्डेय आणि परीक्षा नियंत्रक दिप्ती मिश्रा यांच्याशी ५ एप्रिल २०२५ रोजी पत्रव्यवहार करून सिद्दीकी मोहम्मद शोएब हबीबोद्दीनच्या बी.एस्सी. आणि एम.एस्सी. च्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांची पडताळणी करून देण्याची विनंती केली.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयात ‘बोगस’ प्राध्यापक किती?, पोलिसांनी मागवली सहसंचालकांकडून सगळ्यांचीच माहिती; सहसंचालकांचे विद्यापीठाला पत्र

गायकवाड यांच्या विनंतीनुसार महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी ८ मे २०२५ रोजी नागराज गायकवाड यांना पडताळणी अहवाल पाठवला. सिद्दीकी मोहम्मद शोएब हबीबोद्दीनकडे असलेल्या बी.एस्सी. आणि एम.एस्सी.च्या गुणपत्रिका किंवा पदवी प्रमाणपत्रांच्या कुठल्याही नोंदी विद्यापीठाच्या अभिलेखात उपलब्धच नसल्याचे या पडताळणी अहवालात कळवण्यात आहे आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयात १२ वर्षांपूर्वीच बोगस पदव्यांवर तीन जणांनी मिळवली सहायक प्राध्यापकाची नोकरी, ‘दयावान’ विद्यापीठाने केली फक्त मान्यता रद्द!

महात्मा गांधी काशी विद्यापीठाचा पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर गायकवाड यांनी १५ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे पुराव्यांसह रितसर लेखी तक्रार केली आणि सिद्दीकी मोहम्मद शोएब हबीबोद्दीनने विद्यापीठाची फसवणूक करून पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याची पीएच.डी.ची नोंदणी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचाः बोगस पदवी घोटाळाः कोहिनूर महाविद्यालयातील ‘या’ १२ प्राध्यापकांच्या एमफिल, पीएचडी संशयास्पद, अनेकांकडे ‘लापतागंज’ विद्यापीठाच्या पदव्या?

चौकशीच्या मागणीकडे दुर्लक्ष

आस्मा खान आणि मकसूद खान या दोघांनी बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर अनेक महाभागांनी अशाच बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची फसवणूक केल्याची शंका घेत विद्यापीठ प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणी गायकवाड यांनी कुलगुरूंकडे केली होती. परंतु विद्यापीठाने अजून कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचे सांगत गायकवाड यांनी विद्यापीठाच्या भूमिकेवरच शंका घेतली आहे.

हेही वाचाः परीक्षा विभागातील उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळेंचे संस्थाचालकांशी साटेलोटे, ‘बिदागी’ म्हणून मिळवली पत्नीच्या नावे गॅस एजन्सी!

बोगस पदव्यांचा मोठा ‘हिमनग’?

बनावट व खोट्या पदव्यांचे या चार जणांचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे बोगस पदव्यांच्या या रॅकेटची व्याप्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठही जिल्ह्यात पसरली असण्याची शक्यता बळावली आहे. या दोन विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये अनेकांनी एम.फिल. आणि पीएच.डी. पदव्यांचे आधारे प्राध्यापकाची नोकरी मिळवलेली आहे. त्यापैकी अनेकांकडे बाहेरच्या राज्यातील विद्यापीठांच्या पूर्णवेळ एम.फिल. आणि पीएच.डी.च्या पदव्या आहेत.

हेही वाचाः ‘स्वाभिमाना’चा चुथडा: मराठी लिहिता-वाचताही न येणाऱ्याला बोगस पदव्यांच्या आधारे अध्यापकाची नियुक्ती दिल्याप्रकरणी प्रा. डॉ. शंकर अंभोरे गजाआड

 एकीकडे पूर्णवेळ प्राध्यापकाची नोकरी करत असताना दुसरीकडे त्यांनी पूर्णवेळ एम.फिल. अथवा पीएच.डी.चे अभ्यासक्रम कसे पूर्ण केले? हा संशोधनाचा विषय असून अशा प्राध्यापकांकडे असलेल्या संशयास्पद पदव्यांची पडताळणी केल्यास मराठवाड्यात बनावट आणि खोट्या पदव्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. उघडकीस आलेली बोगस पदव्यांची प्रकरणे हे हिमनगाचे टोक असून मराठवाडाभर बोगस पदव्यांचा मोठा हिमनगच विस्तारला असल्याची चर्चा उच्च शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे.

हेही वाचाः बोगस पदवी घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न, आता तपासाची व्याप्ती वाढवून ‘प्राधिकारी मासे’ गळाला लावणार का?

कुलगुरूंना किती गांभीर्य?

सिद्दीकी मोहम्मद शोएब हबीबोद्दीन  या महाभागाने बोगस पदव्यांच्या आधारे पीएच.डी. प्रवेश मिळवल्याची पुराव्यासह लेखी तक्रार घेऊन नागराज गायकवाड हे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे गेले होते. परंतु कुलगुरू फुलारी यांनी भेट नाकारल्यामुळे त्यांच्या कार्यालयातील आवक विभागात ही तक्रार देण्यात आल्याचे नागराज गायकवाड यांनी सांगितले. कुलगुरूंची भेट घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा इरादा होता. परंतु कुलगुरूंना कदाचित प्रकरणाचे गांभीर्यच नसल्यामुळे त्यांनी भेट नाकारली असावी, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!