
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.कॉम. परीक्षेत प्रश्नपत्रिका लीक करून व्हायरल केल्याचा प्रकार छज्ञपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील हातनूरच्या राष्ट्रीय कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या केंद्रावर घडल्याचे उघडकीस आले आहे. हे महाविद्यालय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे असून भाजप नेते नितीन पाटील हे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
पेपर लिक करून होत्याचे नव्हते करण्यात भाजपचे नेतेच आघाडीवर असल्याचे आरोप अनेकदा झालेले आहेत. आता मराठवड्यातील हा पेपर घोटाळा उघडकीस आला आहे. आता हे परीक्षा केंद्र कायमस्वरूपी तात्काळ रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिले आहेत, अशी माहिती परीक्षा मंडळ संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीकॉम व बीएस्सी या पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ७ एप्रिल पासून सुरु आहेत. या परीक्षेदरम्यान बीकॉम तृतीय वर्ष सहाव्या सत्रात ‘डायरेक्ट टॅक्सेस’ (कोड क्रमांक: एक्स ३०१३) हा पेपर सुरु होण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाइलवर व्हायरल झाल्याचा प्रकार गेल्या शनिवारी (दि.११ एप्रिल) रोजी घडला होता. छत्रपती संभाजीनगर येथील खोकडपुरा भागातील मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर ॲण्ड रिसर्च या महाविद्यालयाच्या सेंटरबाहेर हा प्रकार उघडकीस आला. वाणिज्य शाखेतील तृतीय वर्षाचा ‘डायरेक्ट टॅक्स’ या ८० गुणांचा पेपर परीक्षा सुरू होण्या आधीच विद्यार्थ्यांकडे समाजमाध्यमांवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
या पेपरफुटीचा गंभीर प्रकार समोर आला तेव्हा कुलगुरू डॉ विजय फुलारी हे बैठकीच्या निमित्ताने बाहेरगावी होती. पुढील काही कार्यवाही होईपर्यँत पेपरही सुरु झाला होता. मात्र त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संचालक डॉ. बी. एन. डोळे यांना केंद्रावर पाठवले. तेव्हा डोळे यांनी संस्थाचालकाच झापल्याचीही तक्रार आहे.
या प्रकरणी विद्यापीठाने डॉ. दीपक पाचपट्टे व आणि ‘थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांची समिती गठीत केली. सदर समितीने परीक्षा भवनातील तांत्रिक यंत्रणेच्या साह्याने शोध लावला. त्यानुसार कन्नड तालुक्यातील हातनूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या केंद्रावरून हा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आले आहे. या केंद्रावर १२ वाजून ४७ मिनिटांनी पेपर डाउनलोड होऊन १२ वाजून ५३ मिनिटांनी मोबाईलवर व्हायरल केल्याचे उघडकीस आले. या समितीने या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एस. वाघमारे आणि केंद्रप्रमुख आर. एस. अकोलकर तसेच अन्य प्राध्यापक व विद्यार्थी यांची १५ ते १७ एप्रिल दरम्यान चौकशी करून आपला सविस्तर अहवाल सादर केला. या नंतर कलम ४८ (पाच) अन्व्ये गठीत समितीकडे हा अहवाल आल्यावर त्यांनीही चौकशी करून आपला अहवाल शनिवारी सादर केला. या अहवालानुसार कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी यांनी दिलेले आदेश असे-
१. बी.कॉम. तृतीय वर्ष सहाव्या सत्राचा ‘डायरेक्ट टॅक्सेस’ हा ११ एप्रिल रोजी झालेला पेपर रद्द करण्यात आला आहे. (चार जिल्ह्यातील १४४ केंद्रावर ८ हजार ८४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.)
२. या विषयाची परीक्षा आता ४ मे रोजी घेण्यात येणार आहे.
३. हातनूर येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे. (या ठिकाणी पदवी व पदव्युत्तर परीक्षा केंद्र देण्यात आले होते.)
४. या केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांची २१ एप्रिल पासूनची सर्व परीक्षा कन्नड येथील शिवाजी महाविद्यालय व संत तुकाराम महाविद्यालय या केंद्रावर होणार आहे.
५. या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पेपर डाउनलोड केल्याप्रकरणी संबधित कर्मचारी (संशयित आरोपी) याच्या विरोधात ४८ तासाच्या आत पोलीस ठाण्यात तक्रार (FIR) दाखल करून विद्यापीठास अहवाल सादर करावा.
६. या केंद्रावर बहिःस्थ वरिष्ठ केंद्रप्रमुख प्रा. ए. झेड. शेख (कोहिनूर महाविद्यालय, खुलताबाद) हे जाणीवपूर्वक गैरहजर होते, त्यांनाही तात्काळ खुलासा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कुलगुरू फुलारी यांनी हे आदेश दिले असले तरी आजपर्यंतचा अनुभव पाहता त्या आदेशांची अंमलबजावणी कितपत होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
