
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगरात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या सिटी बसच्या प्रवास भाड्यात २० टक्के वाढ करण्यात आली असून आता किमान प्रवास भाडे ६ रुपये करण्यात आले आहे. ही नवीन दरवाढ १६ एप्रिलपासून अंमलात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) स्मार्ट सिटी बससेवा २०१९ पासून सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्मार्ट सिटीबसचे प्रवास भाड्यात २०२२ मध्ये वाढ करण्यात आली होती. २०२२ मध्ये निश्चित करण्यात आलेले प्रवास भाडेच आजतागायत सुरू आहे. आता सिटी बसच्या प्रवास भाड्यात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रवास भाडे वाढीसाठी स्मार्ट सिटीने काही कारणेही दिली आहेत. २०२२ नंतर बसची देखभाल, सुटे भाग व अन्य घटकांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून चालक व अन्य कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात साधारणत: ४० टक्के पेक्षा अधिक वाढ झाली आहे. या वाढीचा मोठा आर्थिक बोजा स्मार्ट सिटी बस विभागावर पडला आहे, असे स्मार्ट सिटीचे म्हणणे आहे.
खर्चामध्ये झालेल्या वाढीमुळे प्रवासी भाडे वाढ करण्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे १६ पासून प्रवासी भाडे दरात २० टक्के वाढ करण्यात येत आहे. प्रवासी भाडे वाढीनंतर किमान प्रवास भाडे ६ रुपये इतके राहणार आहे. प्रवासी भाडे वाढ पाच रुपयाच्या पटीत न ठेवता एक रुपयाच्या पटीत ठेवण्यात आली आहे. पाच रुपयांच्या पटीत भाडे वाढ केली असती तर प्रवास भाडे वाढ १०० टक्के झाली असती, असेही स्मार्ट सिटीने म्हटले आहे.
एक रुपयाच्या पटीत भाडे वाढ केल्यामुळे सुट्या पैशाची समस्या निर्माण होऊ नये यासाठी वाहकाकडे आवश्यक सुट्टे पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुटया पैशाच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी नागरीकांनी/ प्रवाशांनी ऑनलाईन यूपीआय प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा आणि प्रवासा दरम्यान आवश्यक सुटे पैसे बाळगावेत, असे आवाहन स्मार्ट सिटी बस विभागामार्फत करण्यात आले आहे.
सिटी बसचे सध्याचे व नवीन प्रवास भाडे असे
मार्ग (पासून-पर्यंत) | सध्याचे भाडे | सुधारित भाडे |
सिडको बस स्थानक ते रांजणगाव | रु. ३५ | रू. ४२ |
सिडको बस स्थानक ते जोगेश्वरी | रू.४० | रू.४८ |
सिडको बस स्थानक ते करमाड | रू. ४० | रू. ४८ |
सिडको बस स्थानक ते फुलंब्री | रू. ४५ | रू. ५४ |
सिडको बस स्थानक ते रेल्वे स्टेशन | रू. २५ | रू. ३० |
हर्सूल टी पॉइंट ते फुलंब्री | रू. ३५ | रू. ४२ |
मध्यवर्ती बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट | रू. २५ | रू. ३० |
रेल्वे स्टेशन ते बीडकीन | रू. ३५ | रू. ४२ |
रेल्वे स्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक | रू. १५ | रू. १७ |
मध्यवर्ती बसस्थानक ते वेरूळ | रू. ५० | रू. ६० |
सिडको बसस्थानक ते बाबा पेट्रोलपंप | रू. २० | रू. २३ |
औरंगपुरा ते नाईकनगर | रू. ३० | रू. ३६ |
औरंगपुरा ते वाळूस पोलिस स्टेशन | रू. ३५ | रू. ४२ |
औरंगपुरा ते हिंदुस्थान आवास | रू. ३० | रू. ३६ |
सिडको बसस्थानक ते विद्यापीठ | रू. ३० | रू. ३६ |
सिडको बसस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक | रू. २५ | रू. ३० |
मध्यवर्ती बसस्थानक ते फुलंब्री | रू. ४५ | रू.५४ |