आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, जवळपास एक तपानंतर राजधानीत पुन्हा महिला राज!


नवी दिल्लीः अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर  दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण? याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली होती. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी आतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या (आप) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व आमदारांनी त्यांच्या नावाला सहमती दिली. त्यामुळे शीला दिक्षीत यांच्यानंतर जवळपास एक तपानंतर दिल्लीला पुन्हा महिला मुख्यमंत्री लाभणार आहे.

आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज झाली. या बैठकीत आतिशी यांची आमच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनीच आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत ठेवला होता. त्याला सर्व आमदारांनी संमती दिली. आता आतिशी येत्या दोन तीन दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

तत्पूर्वी आम आदमी पार्टीच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीच्या नेत्यांनी दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचे नाव सूचवले होते. सोमवारी ही बैठक झाली होती. त्यानंतर आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. यापूर्वी भाजपच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दिक्षीत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यानंतर आतिशी यांना आता दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा मान मिळणार आहे.

आतिशी या आम आदमी पार्टीच्या वरच्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. त्या अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत निकटवर्तीयही मानल्या जातात. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री मनीष शिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर केजरीवाल यांनी शिसोदिया यांच्याकडील शिक्षण मंत्रालयासह सर्व खाती आतिशी यांच्याकडेच सोपवली होती. आतिशी या दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. ते आज (१७ सप्टेंबर) सायंकाळी उपराज्यपाल विनय सक्सेना यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द करतील.

आतिशी मार्लेना या आपच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून दिल्लीत सर्वपरिचित आहेत. सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरूवात केली. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये सुरू झालेल्या भ्रष्टाचाराविरोधी आंदोलनात त्या सहभागी होत्या. या आंदोलनादरम्यानच आतिशी या अरविंद केजरीवाल व अन्य नेत्यांच्या संपर्कात आल्या.

पुढे आम आदमी पार्टीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्या आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्या आहेत. त्या दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्यांनी दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन तसेच शिक्षण मंत्री म्हणूनही काम केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!