परभणीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांडविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कराः संभाजीनगरात निदर्शने, किनवटमध्ये मोर्चाद्वारे मागणी


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): परभणी येथील तरूण भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यामुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी समुदाय संतप्त झाला असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलनांद्वारे करण्यात आली आहे.

परभणी येथे मंगळवारी १० डिसेंबर रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी समुदायाने बुधवारी ११ डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत सुमारे २०० हून अधिक आंबेडकरी अनुयायांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.

हेही वाचाः नेमका कश्यामुळे झाला सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू?, पोस्टमार्टेम अहवालात आले धक्कादायक कारण समोर; परभणी पोलिसांच्या ‘बनवेगिरी’चीही पोलखोल

अटक केलेल्या आंबेडकरी अनुयायांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या ३५ वर्षीय भीमसैनिकाचा रविवारी सकाळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालाय सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याने त्याचा धक्का बसून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक पोस्टमार्टेम अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप आंबेडकरी अनुयायांकडून केला जात असून आज छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि किनवटमध्ये झालेल्या आंदोलनांद्वारे सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली आहे.

संभाजीनगरात जोरदार निदर्शने

छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीची निदर्शने.

छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली. या ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार, कैलास गायकवाड, मुकुंद सोनवणे, गौतम खरात, विजय वाहुळ, बंडू कांबळे, ऍड. धनंजय बोरडे, श्रावण गायकवाड, राहुल साळवे, अरविंद कांबळे, राजू साबळे, विशाल इंगळे, जयकिशन कांबळे, दिपक निकाळजे, राहुल जाधव, सोनू नरवडे, शैलेंद्र मिसाळ, गुल्लु वाकेकर, संदीप आढाव, लखन दांडगे, कपिल बनकर, गौतम गणराज, रणजित दाभाडे, बाळू वाघमारे, सिद्धार्थ गंगावणे, सुनील कोतकर, सुनिल वाकेकर, राहुल वडमारे, श्रीरंग ससाणे, संदीप वाहुळ, रमेश मगरे, नवल सूर्यवंशी, कुणाल खरात, प्रकाश इंगळे, प्रमोद तायडे, पवन पवार आदींसह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 किनवटमध्ये कडकडीत बंद, तहसीलवर मोर्चा

किनवटमध्ये सर्वपक्षीय आंबेडकरवादी व संविधानप्रेमी कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

परभणी येथील आंबेडकरी अनुयायांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार धरून पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह अन्य मागण्यांसाठी किनवटमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय आंबेडकरवादी व संविधानप्रेमी कृती समितीच्या वतीने किनवटच्या तहसील कार्यालयावर आज मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चात रिपाइंचे मराठवाडा उपाध्यक्ष दादाराव कयापाक, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, तालुका विधी सेवा समितीचे सदस्य ऍड. मिलिंद सर्पे, माजी नगराध्यक्ष अरूण आळणे,  शांतीभूमीचे अध्यक्ष शंकर नगराळे, नाभिक महामंडळाचे विजय पोलसवार, प्रवीण गायकवाड, विवेक ओंकार, निखिल वाघमारे, मिलिंद कांबळे, निखिल कावळे, राहुल सर्पे, ऍड. सम्राट सर्पे, सुगध नगराळे, माधव कावळे, गंगुबाई परेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

  • परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या मुख्यसूत्रधारांचा तत्काळ शोध घेऊन त्यांना बेड्या ठोका आणि या विटंबना प्रकरणातील आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.
  •  सोमनाथ व्यकंट सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत १५ डिसेंबर २०२४ रोजी मृत्यू झाला.  पोलिस कोठडीत असताना पोलिसांनी त्याला अमानुष मारहाण केली. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरून पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. १२ डिसेंबर २०२४ रोजी परभणी येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जाण्यास पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड हे जबाबदार असून त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करून त्यांना तत्काळ निलंबित करा.
  • सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकर्त्याच्या कुटुंबीयाना शासकीय निधीतून ५० लाख रुपये मदत द्या.
  • निष्पाप आंबेडकरी नागरिक विशेषतः तरूणांवर एफआयआर दाखल करून त्यांना अमानुष मारहाण करण्यासाठी नियोजनबद्धरितीने राबवण्यात येणारे परभणी येथील पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन तत्काळ थांबवा.
  • परभणीतील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास अपयशी ठरलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करा आणि त्यांची विभागीय चौकशी करा.
  • परभणी येथील जाळपोळ व दगडफेकीला जबाबदार धरून आंबेडकरी समुदायातील पुरूष, महिला व तरूणांवर पोलिसांनी जातीयद्वेषातून दाखल केलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्या.
  • पोलिसांच्या अमानुष मारहाणीत जखमी झालेल्या आंबेडकरी समुदायातील पुरूष, महिला व तरूणांवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करा आणि त्यांना नुकसान भरपाई द्या.

पोलिसांमुळेच परिस्थिती चिघळल्याचा आरोप

या बंदच्या काळात कायदा व सुव्यवस्था स्थिती अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी परभणी पोलिसांची होती. परंतु परभणी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे परिस्थिती चिघळली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या परिस्थितीला परभणीचे पोलिसच पूर्णतः जबाबदार असताना मात्र त्यासाठी आंबेडकरी समुदायाला जबाबदार धरून त्यांच्यावर  पोलिसांकडून अन्याय-अत्याचार करण्यात येत आहेत, असा आरोप छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.

पिढ्या उद्धवस्त करण्याचे षडयंत्र थांबवा

कोबिंग ऑपरेशन करून तरूण आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून त्यांचे भवितव्य उद्धवस्त करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. या षडयंत्राच्या आडून आंबेडकरी तरूणांच्या पिढ्या बरबाद करण्याचा प्रयत्न होत आहे, तो महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज कदापिही खपवून घेणार नाही, याची राज्याचे मुख्य सचिव म्हणून आपण गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक आहे. आमच्या या मागण्या तातडीने शासन दरबारी पोहोचवाव्यात आणि या मागण्या तत्काळ मान्य होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा, अन्यथा महाराष्ट्रातील आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि किनवटमधील आंदोलनाद्वारे मुख्यसचिवांना देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!