छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): छत्रपती संभाजीनगर येथील उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयात नियुक्त करण्यात आलेले अधिकारी संस्थाचालकांचे एजंट आणि दलाल आहेत की काय? असा प्रश्न पडावा, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी वनिता उदयराव उर्फ व्ही. यू. सांजेकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महाविद्यालयात जाऊन चौकशीच्या नावाखाली संस्थाचालकाचीच फुल्ल टू चाटुगिरी करत तेथील प्राध्यापकांशी अरेरावी केली आणि अपमानास्पद भाषेत त्यांचा पाणउतारा केला. सांजेकरांनी केलेली अरेरावी आणि दिलेल्या धमक्या एका प्राध्यापकाने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केल्या. ती ऑडिओ क्लिप न्यूजटाऊनच्या हाती लागली आहे. या ऑडिओ क्लिपमधील सांजेकरांची भाषा आणि तोरा पाहता त्या तक्रार करणाऱ्या प्राध्यापकांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी नव्हे तर संस्थाचालकाची दलाली करण्यासाठीच गेल्या होत्या, या आरोपाला पुष्टी मिळते.
घटना ८ मे रोजीची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याची तक्रार औरंगाबाद विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालकांकडे ईमेलद्वारे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी व्ही. यू. सांजेकर ८ मे रोजी माकणीत धडकल्या. सांजेकर येणार असल्यामुळे सुट्या सुरू असतानाही प्राचार्यांमार्फत संस्थाचालकांनी सर्व प्राध्यापकांना महाविद्यालयात बोलावून घेतले आणि जमलेल्या प्राध्यापकांसमोर सांजेकरांच्या फुल्ल टू चाटुगिरीचा नमुना सुरू झाला. सांजेकरांची ही ऑडिओ क्लिप न्यूजटाऊनकडे आहे. परंतु त्यांनी वापरलेली भाषा ही तमाम प्राध्यापकांचा अवमान करणारी असल्यामुळे आम्ही ती प्रसिद्ध करण्याचे टाळत आहोत.
मी खास विषयावर चर्चा करण्यासाठी येथे आले आहे, असे सांगत सांजेकरांनी तुमच्या पगाराचा नेमका काय इश्यू आहे? अशी विचारणा केली. उपस्थित प्राध्यापकांनी पगार वेळेवर होत नाहीत, अशी तक्रार केल्यानंतर ‘वेळेवर म्हणजे नेमके काय असते?’ असा प्रतिप्रश्न प्राध्यापकांनाच केला. वेळेवर पगार होत नाही, या साध्या सरळ भाषेतील तक्रारीचा अर्थही सांजेकरांना समजत नसेल तर उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून काम करण्यास त्या सक्षम कश्या? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
तुम्ही किती पिरियड्स घेता, बघतेच मी!
चौकशीच्या नावाखाली सांजेकरांनी माकणीच्या प्राध्यापकांशी जी भाषा वापरली, ती अपमानास्पद तर आहेच, पण ती भाषा सांजेकर यांच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचीही आहे. ‘आधी स्वतःच्या अपॉइंटमेंट्स करून घ्यायच्या. संस्थेकडून सगळे फायदे घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आता आडमसटम सगळ्यांनी तक्रारी करायच्या? शोभतंय का हे? आणि आम्ही जर काढलं तर तुम्ही किती पिरियड्स घेता? तुमचे किती टाचण रेडी आहेत. काढू का गावीत सरांचं आता किती नोट्स आहेत त्यांच्याकडे? किती पिरियड्स घेतले ते पाहते. चेक करते मी. जसं आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो. तेव्हा कायम लक्षात ठेवा की आपल्याकडे चार बोटं असतात,’ असे सांजेकर म्हणाल्या. आपण जणू काही मालक आहोत आणि समोर बसलेले प्राध्यापक आपले गुलाम आहेत, अशा तोऱ्यात सांजेकर तब्बल १३ मिनिटे प्राध्यापकांशी अरेरावी करत अर्वाच्च भाषेत बोलत राहिल्या आणि बिचारे प्राध्यापक निमूटपणे ऐकून घेत राहिले.
प्राचार्य आणि संस्थाचालकाचे एकत्रित बँक खाते असल्यामुळे पगार वेळेवर होण्यात मोठी आडकाठी आहे, अशी प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मूळ तक्रार होती. सांजेकरांना या तक्रारीचा निपटारा करायचाच असता तर आपल्या कार्यालयाकडून पगार कधी गेला आणि प्राध्यापकांच्या पदरात तो कधी पडला, याच्या कार्यालयीन कागदपत्रे तपासली असती तरी नेमकी समस्या सांजेकरांच्या लक्षात आली होती. परंतु संस्थाचालकाची चाटुगिरीच करायची आणि तक्रारदार प्राध्यापकांचा पाणउताराच करायचा असा मनोमन निश्चय करून गेलेल्या सांजेकरांना ही कागदपत्रे तपासण्याचीही गरज वाटली नाही.
तुमचा अभ्यास झिरो, पेपरची नावेही माहीत नसतात तुम्हाला!
त्या पुढे बोलतच गेल्या. ‘प्राचार्यांचं आणि संस्थाचालकांचं एकत्र अकाऊंट आहे म्हणून सांगता तुमची स्वतःची काय कामं आहेत ते बघा ना आधी? किती विद्यार्थी येतात तुमच्या क्लासमध्ये? किती लोकं तुम्ही तुमच्या विषयाचा अभ्यास करून शिकवता? तुमच्या सगळ्या पेपर्सची नावं तुम्हाला माहिती नसतात. झिरो अभ्यास आहे तुमचा. डबे घेऊन यायचं, इथे येऊन खायचं आणि निघून जायचं. आणि मग अशा चर्चा करायच्या, अशा गोष्टी करायच्या सगळ्या, अशा शब्दांत सांजेकरांनी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना झापझाप झापले.
संस्था त्यांची, तेच मालक!
‘संस्था त्यांची आहे, मालक ते आहेत. त्यांच्या सहीचं एक जरी पत्र आले की अकाऊंट माझ्याकडेच ठेवीन तर तुमच्या दहा जणांच्या सह्यांचे पत्र आले तरी काही फरक पडत नाही… लाईट आली, मी सत्य बोलते’, असेही सुनावण्यास सांजेकरांनी मागेपुढे पाहिले नाही.
ज्याने नोकऱ्या दिल्या, त्याचीच निगेटिव्हीटी काढता का?
सांजेकरांनी प्राध्यापकांना केवळ धमक्याच दिल्या नाहीत तर त्यांच्या शब्दाशब्दातून संस्थाचालकाच्या चाटुगिरीची लाळ टपकत होती. त्या म्हणाल्या,’ ज्या माणसानं तुम्हाला आपली स्वतःची जागा देऊन एवढी मोठी बिल्डिंग बांधून तुम्हाल नोकऱ्या दिल्या. त्या माणसाची तुम्ही निगेटिव्हीटी काढता. पण तुमचं काय ते तुम्ही पहात नाही? एकाला सुद्धा असं वाटलं नाही आपलं काय… अपडाऊनवाले मेंबर किती आहेत इथे? सांगा अपडाऊनवाले किती आहेत?…मग चालतं का उमरग्याला राहिलेलं? एकट्या प्राचार्यांचं अकाऊंट लागतं, संस्थाचालकासोबतचं अकाऊंट चालत नाही. मग उमरग्याला राहिलेलं चालतं का? यांना का दिला टीए? का एचआरए दिला यांना? आतापर्यंतचे असेसमेंट लावा. यांचा जेवढे जेवढे अपडाऊन करतात त्या सगळ्यांचा एचआरए कॅन्सल करा… अपडाऊनवाल्यांचे सगळ्यांचे घरभाडे कॅन्सल करा. इमिजिएटली…जिथून लागले तिथून यांची घरभाड्याची वसुली लावायची, असे फर्मानच सांजेकरांनी सोडले.
या संस्थेत अपॉइंटमेट्सचे पैसे घेत नाहीत!
सांजेकर या भारत शिक्षण संस्थेच्या जणू काही एजंट किंवा दलाल म्हणूनच माकणीत गेल्या होत्या, असा त्यांच्या बोलण्याचा अविर्भाव होता. त्या म्हणाल्या ‘…आणि सगळ्यात महत्वाचे एवढी मोठी जुनी संस्था. ज्या संस्थेमध्ये कुठलेच कधीच वादविवाद आमच्या कानावर आले नाहीत. प्रत्येक संस्थेमध्ये आम्हाला असे ऐकायला येते की अपाँइंटमेंटच्या वेळेला घेऊन देऊन एक्सवायझेड… बऱ्याच गोष्टी आहे त्या तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहेत. पण या संस्थेचे कधीच काही आमच्या कानावर ऐकायला आलेलं नाही. त्यामुळे आम्ही कधी कॉन्गीजन्स घेतला नाही. पण आता जे तुमचं वादविवाद घडतं हे ऐकाल्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं की, ज्या संस्थेमध्ये आजपर्यंत आपल्याला कधी कुणी अपाइंटमेंट्सचे म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीचं इव्हन इतर संस्थांमध्ये साधं जीपीएफ काढायचं असलं तरी पण मिटींग…साधं जीपीएफ काढायला. तसं तुमच्याकडचे माझ्या कानावर तरी आलेलं नाही.’ सांजेकरांचा हा तोरा आणि संवाद ऐकून त्यांना संस्थाचालकाची एवढी चाटुगिरी करण्याची आणि तळी उचलून धरण्याची ऊर्जा देणारे असे कोणते ‘औषध’ संस्थाचालकाने दिले होते, असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
शिकवा म्हटलं की तक्रारी करताय का?
‘का गावीत सर तुम्हाला तुमचं जीपीएफ काढायला तुमच्या अध्यक्षाची परवानगी लागते का?…नाही लागत ना? का जाऊन तुम्ही तिथून परवानगी घेऊन येता की मी जीपीएफ काढतोय… म्हणजे तुमच्या जीपीएफवरती तुमचा अधिकार आहे थोडक्यात. मग आतापर्यंत एवढं चालणाऱ्या संस्थेमध्ये आता तुम्हाला अचानक काय अडचण आली की तुम्हाला सगळ्यांना मेल करावे लागतात. तुम्हाला सगळ्यांना उठून उभं रहावं लागतंय ते मला जाणून घ्यायचं आहे…. का असं आहे का की लेक्चरर्स घ्या म्हटलं, मुलांना शिकवा म्हटलं या कम्प्लेंन्टस करायच्या हे अकाऊंट असं आहे… ते अकाऊंट तसं आहे. मागच्या पंचवीस वर्षांपासून तर अध्यक्षांचे आणि प्राचार्यांचे सेम अकाऊंट आहे. तर त्याला तुमचं ऑब्जेक्शन नव्हतं आणि आता काय झालं तुम्हाला? आता ऑब्जेक्शन काढताय तुम्ही सगळे जण? मग पंचवीस वर्षांपासून का नाही काढलं? आमचं पहिलं पत्र कधी आलंय की सेपरेट प्राचार्यांचं अकाऊंट करा म्हणून. तेव्हापासून तुम्ही लोकं शांत का बसले?, असा सवाल सांजेकरांनी केला. त्यामुळे बिचारे प्राध्यापक चांगलेच गांगारून गेले.
सांजेकर भ्रष्ट अधिकारी!
माकणीच्या महाविद्यालयात जाऊन प्राध्यापकांना ज्ञानाचे डोस पाजवणाऱ्या व्ही. यू. सांजेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. पैश्याची मागणी करत पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळालेल्या प्राध्यापकांच्या सेवापुस्तिका अडवून ठेवल्याचा आणि पैसे घेतल्याशिवाय त्या प्रकरणे निकालीच काढत नसल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिव्हर्सिटी अँड कॉलेज टिचर्स असोसिएशन म्हणजेच बामुक्टोने २०१६ मध्ये केला होता.
सांजेकर या प्राध्यापकांशी उद्धट वर्तन करतात, कायदेशीर कामांची अडवणूक करतात, बेकायदेशीर प्रकरणे निकाली काढतात आणि पैसे न देणाऱ्यांची प्रकरणे कित्येक महिने प्रलंबित ठेवतात, असा आरोप बामुक्टोने सहसंचालकांना दिलेल्या निवेदनात केला होता. सांजेकरांच्या विरोधात तक्रारी वाढल्यामुळे ३१ मे २०१६ रोजी त्यांची औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातून नागपूरच्या विभागीय सहसंचालक कार्यालयात बदली करण्यात आली होती. तेथे काही दिवस काढून सांजेकर पुन्हा औरंगाबादच्या विभागीय सहसंचालक कार्यालयात आल्या आणि पुन्हा त्यांनी आपले प्रताप सुरू केल्याचे या घटनेवरून दिसत आहे.
सांजेकरांना निलंबित करा
माकणीच्या महाविद्यालयात जाऊन प्राध्यापकांशी अपमानास्पद भाषेत बोलून जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे व्ही. यू. सांजेकर यांना निलंबित करा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष डॉ. संजय कांबळे यांनी उच्च शिक्षण सहसंचालकांकडे केली आहे. सांजेकरांनी प्राध्यापकांना धमक्या दिल्या, अरेरावीची भाषा वापरली आणि प्राध्यापकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी करण्यात आली आहे. सहसंचालक कार्यालयात गेलेल्या प्राध्यापकांशी सांजेकर या उद्धट वर्तन करतात, अपमानास्पद वागणूक देतात, असेही या निवेदनात म्हटले आहे.