फलटण  आणि विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना, विधी व न्याय विभागाकडून अधिसूचना जारी


मुंबई: सातारा जिल्ह्यातील फलटण आणि सांगली जिल्ह्यातील विटा येथे  ४ फेब्रुवारीपासून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे त्याचे पिठासीन अधिकारी असल्याची माहिती विधी व न्याय विभागाच्या विधी सल्लागार व सहसचिव विलास गायकवाड यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील दिवाणी व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसारची प्रकरणे या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील.

४ फेब्रुवारी २०२४ पासून या न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हे फलटण येथील सत्र उपविभागाचे सत्र न्यायाधीश असतील, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

विटा येथील न्यायालयाचे कार्यक्षेत्र चार तालुके

सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या महसुली तालुक्यातील प्रकरणांसाठी ४ फेब्रुवारीपासून खानापूर तालुक्यातील विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे त्याचे पिठासीन अधिकारी आहेत.

सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील दिवाणी व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसारची प्रकरणे नव्याने निर्मित केलेल्या विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील. सांगली जिल्ह्याचे प्रमुख सत्र न्यायाधीश हे फलटण येथील सत्र उपविभागाचे सत्र न्यायाधीश असतील, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!