डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ उद्या ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यानिमित्त विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी डॉ. येवले यांच्या सत्कारांचा रतीब घातला जात आहे. आज दुपारी साडेतीन वाजता विद्यापीठाच्या सिफार्ट सभागृहात डॉ. येवलेंचा सेवागौरव समारंभ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारे, त्यांच्या कार्य पद्धतीवर गंभीर स्वरुपाचे प्रश्न उपस्थित करणारे हे अनावृत्त पत्र…
- डॉ.तुकाराम सराफ, (लेखक विद्यार्थी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख आहेत.)
प्रति,
मा. डॉ. प्रमोद येवले,
कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
जय महाराष्ट्र!
आदरणीय सर, आपणास विद्यापीठात येऊन साडेचार वर्ष पूर्ण झाली आहेत. ३१ डिसेंबर २०२३ रोजी आपण या विद्यापीठांच्या कुलगुरुपदावरून नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहात. आपणास पुढील आयुष्य आरोग्यदायी जावो यासाठी आधीच मनःपूर्वक शुभेच्छा देतो!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत आपण कुलगुरू म्हणून आलात. प्रारंभी दीक्षाभूमीवरून आपण या पावनभूमीत येत आहात याचा परमानंद आमच्यासारख्यांना होणे हे सहाजिकच!
आपण विद्यापीठात आल्यानंतर अतिशय शिस्तबद्ध, सचोटीने सर्वांना एकत्रित करून विद्यापीठाची टीम बांधून विद्यापीठाला शैक्षणिक गुणवत्तेच्या शिखराकडे घेऊन जाल ही अपेक्षा साडेचार वर्षानंतर आम्ही आजही चाचपडत पाहात आहोत.
मागील महिनाभरापासून विद्यापीठाची आपण नियुक्त केलेली प्रभारी टीम विविध वृत्तपत्रांना फोन करून करून आपल्या मुलाखती घ्याव्यात, त्या प्रसिद्ध करून आणाव्यात, आपले निरोप समारंभाचे कार्यक्रम घ्यावेत, यासाठीचा असणारा अट्टाहास करत असताना आम्ही प्रत्यक्ष पाहतच आहोत.
आजकाल स्वतःचा उदोउदो करून घेण्याची परंपरा आपण सामाजिक व राजकीय जीवनात पाहतच आलो आहोत. परंतु आता शैक्षणिक क्षेत्रातही आणि त्यातल्या त्यात परम पूजनीय डॉ. बाबासाहेबांचे नाव असणाऱ्या विद्यापीठात आपल्या माध्यमातून याचा कळस रचल्या जातोय याबद्दल मनात तीव्र वेदना होत आहेत. परवा एका वृत्तवाहिनीला दिलेली आपली मुलाखत ऐकत होतो आणि म्हणून न राहून हा लिखाणाचा प्रपंच करावाच लागला त्याबद्दल क्षमस्व!
साडेचार वर्षातील तीन वर्षे घरातून कारभार
सर्वप्रथम आपण विद्यापीठामध्ये मागील साडेचार वर्षांत किती काळ पूर्णवेळ काम केले याबद्दल आवर्जून लेखाजोखा केला मांडला पाहिजे. ( वैयक्तिक आजारपणावर बोलू नये असा प्रघात असूनही लिहित आहे त्याबद्दल क्षमस्व).
आपण कुलगुरू झाल्यानंतर साधारणतः सात-आठ महिन्यानंतर एका मोठ्या आजाराने (यात आपणाला जागेवरून उभेही राहता येत नव्हते अशा आजाराने) ग्रासले होते. त्यासाठी आपण जवळपास महिनाभर नव्हे त्याहीपेक्षा जास्त काळ दवाखान्यामध्ये ऍडमिट राहिलात. तदनंतर साधारणतः रोज आपण आपल्या निवासस्थानी बोलावूनही वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत होतात. त्यामुळे साधारणतः एक ते सव्वा वर्षे आपण आपल्या आजारपणात आपल्या निवासस्थानी राहून विद्यापीठाचा कारभार चालवला.
एकूणच कारभारावर आपली मर्जी असल्यामुळे तत्कालीन व्यवस्थापन परिषद सदस्य व आपण विद्यापीठाची खरेदी समिती, बांधकाम समिती, परीक्षा खरेदी याच्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टींत रस दाखवला नाही. त्यामुळे तुम्ही त्या केल्याही नाहीत, हे वेगळे सांगणे नको.
आत्ताच कळाल्यानुसार आपले पुढील दोन वर्षाचे टेंडर प्लान खरेदी समितीमध्ये नवीन आलेल्या व्यवस्थापन परिषद सदस्यांमुळे रद्द करावे लागले हे ऐकून जरा दुःख झाले.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक आपण आपल्या आजारपणाच्या काळात आणि त्यानंतर कोविडमुळे पुन्हा दीडवर्षे ऑनलाइन शिवाय घेतल्याच नाहीत. म्हणजे आजारपणाचे दीडवर्षे आणि कोविडचे दीड वर्षे यामध्ये आपण एकहाती कारभार केला.
विद्यापीठांमधल्या सगळ्या खरेदीचे निर्णय आपण आपल्या विशेष अधिकारात म्हणजेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम १२/७ नुसार घेतले.
कोणत्याही विद्यापीठ कायद्यातील व अधिकार मंडळाच्या बैठका न घेता ‘हम है राजा, राज करे’ हीच आपली भूमिका राहिली. त्यामुळे साधारणतः या साडेचार वर्षांत तीन वर्षे आपण आपल्या घरात बसून व ऑनलाइन पद्धतीनेच विद्यापीठाचा कारभार चालवला.
माफ करा, तुम्हाला प्रोफेसर संबोधत नाही
कुलगुरू महोदय, मी आपल्या नावापुढे मी मुद्दामहून प्रोफेसर लिहित नाही. कारण त्याबाबत कोर्टात केस सुरू आहे की, आपण प्रोफेसर झालाच नाहीत! असो कुलगुरूपदावर असणाऱ्या व्यक्तीबाबत त्याच्या गुणवत्तेवर जास्त बोलू नये, अशी परिस्थिती तुम्ही आमच्यावर आणलीत त्याबद्दलही आपले धन्यवाद!
हीच का ती आर्थिक शिस्त?
विद्यापीठाच्या आर्थिक शिस्तीबाबत आपण खूपच उहापोह केल्यामुळे आपणास सांगू इच्छितो की, विद्यापीठाच्या निधीसाठी आपण मराठवाड्याच्या संतपीठाला सापत्न वागणूक दिली. विद्यापीठाच्या विविध विभागांना आपण निधी दिला नाही. विद्यापीठ फंडातील प्राध्यापकांना वेतन आयोग असो की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार असो, तोही आपण दिला नाही. परंतु आपण विद्यापीठ निधीतून ४ लाख ७० हजार रुपये आपल्या मेडिकल बिलाचे जे घेतले आहेत, ते कृपया आपण कुलगुरूपदाचा कार्यभार सोडण्यापूर्वी भरावेत, अशी आग्रही विनंती आम्ही आपणास करत आहोत.
स्वार्थासाठी विद्यापीठ फंडाचा वापर
आपण विद्यापीठाच्या निधीचा वापर स्वतःच्या उन्नतीसाठी केला. आपण फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी अथवा सेंट्रल विद्यापीठात कुलगुरू होण्यासाठी वारंवार ज्या दिल्ली वाऱ्या केल्या, त्याऐवजी विद्यापीठाच्या हितासाठी अथवा विद्यापीठाच्या फंड जमा करण्यासाठी दिल्लीत यूजीसी, शिक्षण मंत्रालयात वाऱ्या केल्या असत्या तर आपल्या कालावधीत विद्यापीठाला काही प्रमाणात का होईना आर्थिक लाभ झाला असता. (विद्यापीठासाठी स्वतःच्या प्रयत्नातून एकही रुपया निधी न आणणारे कुलगुरू म्हणून आपला गौरव करणे उचित होईल).
विद्यापीठाच्या खर्चातून महागडे गिफ्ट
कुलगुरू परिषदेवर आपणास सदस्य म्हणून घेण्यासाठी आपण कुलगुरू परिषदेच्या सचिवांना दोन वेळेस विद्यापीठाच्या खर्चाने शहरात बोलवले व त्यांना साज-सत्कारासोबत महागडे गिफ्टही दिले. त्याचीच ‘बक्षिसी’ म्हणून विद्यापीठाच्या पदवीदान (सर्व विद्यार्थ्यांना पदवी न दिलेल्या) सोहळ्यानंतर तीन दिवसांनी आपल्याला कुलगुरू परिषदेवर सदस्य म्हणून घेण्यात आले.
समोरासमोर पैसे देणे आणि पाठीमागून पैसे देणे, गिफ्ट देणे यातला फरक आपल्यासारख्या विद्वान कुलगुरूंकडून शिकण्यासारखा आहे, हे आम्हाला त्याच वेळेस कळाले. आपले वय ६५ वर्षे पूर्ण होत आहे. त्या कारणाने आपण आगामी काळात अधिक सक्षम राहून स्वतःच्या खिशातून दिल्ली वाऱ्या कराव्यात यासाठी आपणास शुभेच्छा!
संस्थाचालकांना दट्टया लावून वसुली
आपल्या मागील कुलगुरूंच्या कार्यकाळात जळगाव विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मिलिंद परिसरामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी धम्म परिषद आयोजित केली होती. त्यासाठी आपल्या विद्यापीठाने सहआयोजक व्हावे अशी विनंती त्या कुलगुरूंनी तत्कालीन कुलगुरू प्रोफेसर डॉ. बी. ए. चोपडे यांना केली होती. त्यावर त्यांनी अशी परिषद विद्यापीठाला घेता येणार नाही असे कळवले. जुना संदर्भ सांगण्याचे कारण असे की, कुलगुरू महोदय तुम्ही दीड वर्षांपूर्वी आपल्या शहरात हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे (विद्यापीठात सर्व सुविधा असतानाही) आतिशय थाटात कुलगुरू परिषदेचे आयोजन केले होते. आधी सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमासाठीही दिल्लीच्या ‘त्या’ महिला सचिवांना निमंत्रित केले होते व त्यांच्या सांगण्यावरून या कार्यक्रमावर २३ ते २७ लाख रुपये खर्च करण्यात आला.
कुलगुरू महोदय, तुमच्या प्रभारी टीमने अनेक संस्थाचालकांवर दट्ट्या लावून एक लाख, दोन लाख अशी वसुली केली. अनेकांची वसुली ही चेकच्या माध्यमातून तर अनेकांची वसुली ही कॅश स्वरूपात करण्यात आली.
वसुली दिल्लीत जमा अन् खर्च विद्यापीठाचा
हा जमा झालेला पैसा हा दिल्लीमध्ये महिला सचिवांकडे जमा करण्यात आला व विद्यापीठाच्या खर्चाने हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे कुलगुरू परिषद घेण्यात आली. या कुलगुरू परिषदेचे वैशिष्ट्ये असे की, या परिषदेसाठी संपूर्ण भारतातून १३ कुलगुरू उपस्थित होते. उद्घाटनानंतर हे तेराही कुलगुरू देवदर्शनासाठी किंवा परत आपल्या ठिकाणी गेले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रामा हॉटेलचे बुकिंग दोन दिवसांसाठी करण्यात आले होते. रोज ५०० ते ५५० लोकांचे जेवण दोन दिवसांसाठी बुक करण्यात आले होते.
कुलगुरू महोदय, कृपया सदर कुलगुरू परिषदेचे फोटो जाहीर करावेत. या परिषदेसाठी विद्यापीठात फोन करून करून प्राध्यापकांना बोलावून घेतल्यानंतरही उद्घाटन कार्यक्रमामध्ये उपस्थिती ही ५० लोकांपेक्षा जास्त नव्हती.
या परिषदेचा विषय ‘परीक्षेमधील नवनवीन तंत्रज्ञान व दोष मुक्त परीक्षा’ असा होता याबद्दल तर आवक्षरही बोलण्यात आले नाही. त्याबद्दल कोणता पेपरही प्रकाशित झाला नाही किंवा एवढ्या मोठ्या परिषदेनंतर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये कोणताही बदल किंवा सुधारणा झाली नाही हे विशेष. (परीक्षेचे टेंडर सोडून).
पैसे न देणाऱ्या संस्थाचालकांना जाच
या कार्यक्रमासाठी ज्या विनाअनुदानित संस्थाचालकांकडून पैसे वसूल करण्यात आले होते त्यांना आगामी काळातील शैक्षणिक ऑडिटमध्ये कोणताही त्रास देण्यात आला नाही. परंतु ज्यांनी ज्यांनी कुलगुरू परिषदेसाठी पैसे देण्यास नकार दिला, अशा संस्थाचालकांना जवळपास दोन-दोन लाख रुपये दंड लावण्यात आले व त्यांच्या महाविद्यालयांची विद्यार्थी संख्या ही कमी करण्यात आली. कुलगुरू महोदय, उत्कृष्ट प्रशासक असणारे खाजगी महाविद्यालयात सेवा केलेले तुम्ही प्रत्येकाच्या नाड्या आपल्या हातामध्ये कशा राहतील, याचा पुरेपूर प्रयत्न केला.
४४ प्राध्यापकांमागे चौकशीचे झेंगट
यापूर्वी विद्यापीठात झालेल्या १२७ कोटींच्या घोटाळा प्रकरणात माननीय अर्थतज्ज्ञ व विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थेला शिस्त लावणारे कुलगुरू महोदय, आपण विद्यापीठातील तत्कालीन कुलगुरू, कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी व खरेदी समितीतील सदस्य यांच्यावर कोणताही आरोप न लावता त्यांना क्लीन चिट देत विविध विभागातील प्राध्यापकांवर चौकशी समिती व त्यांची विभागशहा चौकशी करण्याची तरतूद आपल्या अधिकारात केली.
विद्यापीठाची खरेदी हे विभागाचे प्राध्यापक करतात हे दिवास्वप्न तुम्हाला वाटल्या कारणानेच तुम्ही ही चौकशी लावली की या ४४ प्राध्यापकांनी आपल्या विरोधात पुढील चार वर्षे अवाक्षरही काढू नये, यासाठी ही चौकशी लावली? हा शिक्षण व्यवस्थेला पडलेला यक्षप्रश्न आहे.
प्राध्यापकांना हिनतेची वागणूक
कुलगुरू महोदय, खाजगी महाविद्यालयांमध्ये ज्या पद्धतीने शिक्षकांना अतिशय हिनतेची वागणूक दिली जाते, त्याच पद्धतीची वागणूक तुम्हीही तुमच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठातील विभागप्रमुख व प्राध्यापकांना दिली याबद्दल दुमत असता कामा नये.
साडेचार वर्षांत ना चर्चासत्रे, ना परिषदा
कोणताही दोष नसताना खरेदीशी संबंध नसताना प्राध्यापकांच्या या चौकशी प्रकरणामुळे मागील साडेचार वर्षात कोणत्याही विभागात कोणतीही खरेदी, कार्यक्रम, राज्यस्तरीय, राष्ट्रीय सेमिनार हा झाला नाही. कारण की कुलगुरु महोद्य, तुम्ही त्यांना खाजगी महाविद्यालयाप्रमाणे वागणूक दिल्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांचे मनोधैर्य खच्चीकरण झाले. (सदरील प्राध्यापकांशी बोलल्यानंतरच यावर विश्वास ठेवावा हे मुद्दामहून नमूद करतो.)
विभागप्रमुखांना धमक्या
कुलगुरू महोदय, तुम्ही आपल्या साडेचार वर्षांच्या कालावधीमध्ये विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांची सोडाच परंतु सर्व विभाग प्रमुखांचीही एकत्रित बैठक एकदाही घेतली नाही हे विशेष. अनेक जणांना अनेक वेळेस बोलावून तुमचे नुकसान कसे करू शकतो याबद्दल धमकी वजा सूचना मात्र त्यांना जरूर देण्यात आल्या.
धमकावून प्रभारींना रोखले
मागील ६ महिन्यांपासून विद्यापीठातील प्र- कुलगुरू, अधिष्ठाता, परीक्षा नियंत्रक, कुलसचिव, विद्यार्थी विकास संचालक, राष्ट्रीय सेवा योजना संचालक, मनुष्यबळ विभाग संचालक यांनी राजीनामे दिलेले आहेत. तरीही कुलगुरू महोदय तुम्ही त्यांना मी जाईपर्यंत थांबा, असे धमकी वजा बजावत त्यांना सोडले नाही. तसे पाहता कुलगुरू महोदय, ही प्रभारी गॅंग सोडता तुमच्यासोबत काम करण्याची कुणाचीही मानसिकता नव्हती आणि नाहीही! म्हणून आपण जाताना या सगळ्यांचे राजीनामे स्वीकारून जाऊ अशा मानसिकतेत आपण आहात. कारण त्यांनी आपण असतानाही काम केले नाही व आपण नसताना विद्यापीठाचे काय होईल, याची आपण पर्वाही करत नाही ही शोकांतिका आहे.
तुम्हाला सल्ले आवडतातच कुठे?
कुलगुरू डॉ. येवले, मुळातच आपण दिलेल्या मुलाखतीतच मी हुकूमशः आहे हे मान्य करताना आपल्या कामाबद्दल तुम्हीच मत व्यक्त केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून मागील साडेचार वर्षांमध्ये आपण विद्यापीठातील अधिकार मंडळांच्या कोणत्याही बैठका या व्यवस्थितरित्या व मुदतीत घेतलेल्या नाहीत. राज्यपालांनी नियुक्त केलेल्या आपल्या सन्माननीय सल्लागार मंडळाचीही तुम्ही बैठक घेतली नाही ती नाहीच. कारण आपल्याला कुणी सल्ला दिलेलाच आवडत नाही.
तातडीच्या बैठकांचा फार्स
विद्यापीठाचा दैनंदिन कारभार व्यवस्थित चालावा यासाठी विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदही जबाबदार असते. या व्यवस्थापन परिषदेला विश्वासात घेऊन विद्यापीठाचा कारभार करण्यावर महाराष्ट्रातील सर्वच कुलगुरूंचा भर असतो. कारण विद्यापीठ कायद्यामध्ये याची विशेष तरतूद आहे. परंतु स्वतःला हुकुमशहा मानणारे आपण आपल्या आजारपणाच्या कालावधीत अथवा कोविडच्या कालावधीत काही बैठका या ऑनलाइन व तातडीच्या घेतल्या बाकी सगळेच पॅकअप!.
मागील वर्षभरापासून काहीही कारण नसतांना व्यवस्थापन परिषदेच्या दोन तातडीच्या बैठका सोडल्या तर मागील आठ महिन्यापासून ते आज जाण्यापूर्वीपर्यंत आपण बैठक घेतलेली नाही, १८ डिसेंबर रोजी आयोजित केलेली व्यवस्थापन परिषदेची बैठकही आपण रद्द केली. (या बैठकीमध्ये कुलगुरूंच्या व त्यांच्या प्रभारी कुलसचिवांच्या कारभाराची चौकशी करण्याचा ठराव घेण्यात येणार होता म्हणून बैठक रद्द केली अशी माहिती आहे).
जातीपातीच्या भिंती भक्कम केल्या
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असणाऱ्या विद्यापीठांत विद्यापीठ कायद्याची पायमल्ली करणारे आत्तापर्यंतचे प्रभावी कुलगुरू म्हणून कुलगुरू महोदय आपल्या नावाची नक्कीच नोंद करता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर्व समावेशक, जातीपातीचा विचार न करणारा व सर्वांना सोबत घेऊन चालणार्या कुलगुरूंची नितांत आवश्यकता असताना आपल्या कारकीर्दीत आपण जातीच्या भिंती अधिक मजबूत करण्याचे काम ठरवून केले. ही अतिशय क्लेशदायक बाब आहे. आपण केलेली ही कृती अतिशय धोकादायक व शिक्षण व्यवस्था डळमळीत करणारी आहे, हे येथे खेदाने नमूद करावे लागते.
३० कोटी, कुलगुरू व प्रभारी टीम
महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यापीठ व महाविद्यालयांत प्राध्यापकांची पदे भरली जावीत असा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्यानंतर माननीय कुलगुरू महोदय आपण सर्वात प्रथम आपल्या मर्जीतील प्रभारी कुलसचिवांची नियुक्ती केली. केवळ आपले पाय चाटणे, आपण जे सांगाल त्या पद्धतीने विद्यापीठ कायद्याला पायदळी तुडवत निर्णय घेणे, हुजरेगिरी करणे हेच त्या प्रभारी कुलसचिवांची कार्यशैली राहिली. आपला वरदहस्त असल्याकारणाने अनेक कर्मचाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार करून बदल्या, प्रमोशन, स्वतःच्या बायकोच्या मुलाखतीसाठी महाविद्यालयाचे पॅनल बदलून दबाव आणणे असे अनेक विषय करणारे कुलसचिव हे आपण सोबत घेतले.
‘तुमचं पण धुवून घ्या आणि आमचं बी घोडे गंगेत नाहू द्या’ असे धोरण राबवत तुम्ही विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीसाठी आपण विद्यापीठातील अकॅडमिक कौन्सिल, बोर्ड ऑफ डीन व मॅनेजमेंट कौन्सिल यांना कवडीचीही किंमत न देता, परवानगी न घेता, विचारात न घेता विद्यापीठ कायद्याची पायमल्ली करण्यापर्यंत मजल मारत आपण सरळ कुलसचिवांना हाताशी धरत ३० कोटींचा हिशोब बांधत पदभरतीची जाहिरात प्रकाशित केली. प्र-कुलगुरूंसारख्या व्यक्तीलाही पेपरला जाहिरात आल्यानंतरच पदभरती आहे, हे कळते. किती हा तुमचा पारदर्शीपणा?
घेतलेले पैसे परत करावे का लागले?
सदर पदभरती होणारच या आशेने अनेक उमेदवारांकडून घेतलेले पैसे आपणास प्रभारी टीमद्वारे परत करावे लागले. तथाकथित नेत्यांना त्यांनी जमा केलेल्या उमेदवारांना थांबण्यास सांगावे लागले. पदभरतीसाठी आपण काय काय आटापिटा केला, याची जंत्री वाचायची म्हटल्यास एखादा खंड प्रकाशित करावा लागेल.
या विषयात आपण तोंडावर पडलात. शहरातील काही झिलकरी पत्रकार, विद्यापीठाचे पीआरओ, तथाकथित संघटनांचे नेते व काही माजी व्यवस्थापन परिषद सदस्य यांची जोडतोड करूनही पदभरतीचा केविलवाणा प्रयत्न आपल्या अंगलट आला.
मॅनेज करण्याचा अतिआत्मविश्वास नडला!
आपण खाजगी कॉलेजला नोकरी केल्यामुळे आपणाला असणारा मॅनेज करण्याचा अतिआत्मविश्वास आपणास नडला व राजभवनद्वारे सदरील पदभरतीला स्थगिती मिळाली. सदरील पदभरती स्थगितीसोबत आलेल्या पत्रात आपणास स्पष्ट स्वरूपात नमूद केले होते की, आपण पदभरती कोणताही धोरणात्मक निर्णय अथवा नियुक्त्या करू नये. तुमच्याऐवजी दुसरा कुणी एवढ्या प्रतिष्ठेच्या कुलगुरूपदावर असता तर राजभवनाच्या पत्राचा व या विद्यापीठात यापूर्वी झालेल्या प्रकरणांचा विचार करता अतिशय विचारपूर्वक कोणत्याही नियुक्त्या अथवा निर्णय केले असते. परंतु आपण सदर पत्राला न जुमानता पदभरती रद्द केली परंतु आपल्या मर्जीतील इतर नियुक्त्या, निवडी या आजही शेवटच्या क्षणापर्यंत करत आहात ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे.
सत्कार, अभिनंदनासाठी लाजीरवाणा आटापिटा
शिक्षण क्षेत्रात माझा सत्कार करा, माझ्या अभिनंदनचा ठराव करा आणि विद्यापीठाच्या कमिट्यांवर स्वतःची नियुक्ती करून घ्या, असे अघोषित जाहीर प्रगटन आपल्याद्वारे करण्यात आले ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे.
परवा आपल्या प्रभारी टीमने फोन करून उपकेंद्रात आपला सत्कार झाला पाहिजे यासाठी प्राध्यापक व कर्मचारी यांच्याकडून एक हजार व दोन हजार रुपये जमा केले आणि आपला सत्कार घडवून आणला. यासाठी एक अधिष्ठाता व प्रभारी सातत्याने लोकांना फोन करत होते.
शेवटी तुळजापूरची आई तुळजाभवानी आपल्याला पावली आणि आपण विद्यापीठ उपकेंद्राचे अध्यक्ष असणारे मागील साडेचार वर्षाचे आपले सहकारी प्र-कुलगुरू यांना बाजूला करत कायद्याची पायमल्ली करत स्वतःचा व कुलसचिवांचा सत्कार जोरदारपणाने विद्यापीठ उपकेंद्रात करून घेतला.
वसुलीतून जंगी पार्टी
संभाजीनगर शहरातही आपले प्रसिद्धी प्रमुख, प्रभारी, अधिष्ठाता व कर्मचारी संघटनेचे तथाकथित नेते यांनी दोन हजार रुपये प्रत्येकी जमा करून अडीच ते तीन लाख रुपये जमा करून शहरातील बाबा पेट्रोल पंपाजवळच्या हॉटेलमध्ये आपल्या समारोपाची जंगी पार्टी केली याचाही आम्हाला विशेष आनंद होत आहे. आता हे पैसे जमा करण्याचं तर आपल्याला काही माहितीच नसेल याचीही आम्हाला खात्री आहे, त्याबद्दल अगोदरच धन्यवाद. असो.
पदभरतीसाठी आपण रात्री आकरा-आकरा वाजता माजी व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या घरी बैठका केल्या. काही व्यवस्थापन परिषद सदस्य व प्रभारी टीम यांच्यासह फर्दापूर गेस्ट हाऊस व प्रभारी यांचे फार्म हाऊस येथे झालेल्या बैठका, पार्टी यामुळे शिक्षण क्षेत्रातही खाजगी व राजकीय पद्धती आपण सहजपणाने रुजवली याबद्दल खरे तर आपले आम्ही अभिनंदन केले पाहिजे का? म्हणजे येणाऱ्या काळातही अशा व्यवस्था उभ्या राहतील आणि शिक्षण व्यवस्था मात्र संपून जाईल!
आजही पदभरती हा विषय काढला की आपण अस्वस्थ होतात, हे आपण सिद्ध केले आहे. पदभरतीचे साधारण ३० कोटीचे हिशोब न जुळल्यामुळे आपण किती बेचैन आहात हे न विचारलेले बरे.
फोडा आणि राज्य करा निती
१५ लाख ५० हजार रुपये खर्चाच्या विनानिविदा बायोमेट्रिक खरेदीच्या सुरस कथा आपल्या माघारी आम्ही ऐकतो आहोत. त्यावर मात्र आमचा विश्वास बसत नाही कारण वारंवार आपली आर्थिक शिस्त हे शब्द आमच्या कानावर आदळतात. कुलगुरू महोदय, आपण या विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षण संस्थाचालक यांच्यामध्ये फोडा आणि राज्य करा या रीतिने राज्य केले.
तुमचे तोंड आम्हाला वारंवार बघावे लागणार
कुलगुरू महोदय, आपणास पत्र लिहिताना आलेला महापूर काही थांबायचं नाव घेत नाही. बघा तुमचा तो जाता-जाता स्वतःचा हँडसम फोटो मात्र आपण कुलगुरूंच्या दालनात लावण्यासाठी जे कारण शोधून काढले त्यासाठी आपल्या राजकारणाला दाद दिली पाहिजे. आपण आगामी काळात आमच्यासारखे कार्यकर्ते कुलगुरू दालनात आले की तुमचे तोंड बघावे लागणार यापेक्षा आमचे भाग्य ते काय!
या विद्यापीठात यापूर्वीही संस्कृती कधीही नव्हती आपल्या माध्यमातून या ठिकाणी ती रुजली याबाबत आम्ही न बोललेले बरे. तरीही जड अंतकरणाने आपणास आपल्या उर्वरित आयुष्यासाठी व शिक्षणाक्षेत्रापासून जास्तीत जास्त दूर राहण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.!!
…तेव्हा तुमची आठवण जरूर होईल!
येणाऱ्या काळात विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन होईल त्यावेळेस तुमची आवर्जून आठवण येणार आहे ,कारण या पाच वर्षात आपण काय केले हे सिद्ध होणारच आहे. दुर्दैव फक्त ते आपण इथे नसतांना होणार. आम्ही पोटतिडकिने हे लिहिलेले लोकांना तोपर्यंत कसे पटणार? परंतु मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना हे नक्की पटेल आणि याचा ते नक्की विचार करतील या आशेवरच लिहिण्याचा हा प्रपंच करतो आहे.
आम्ही कोण हा प्रश्न मात्र तुमच्यासमोर सातत्याने येणार त्यासाठी….
आम्ही आंदोलनातले…आम्ही विद्यार्थी संघटनातले…आम्ही सिनेट मधले…आम्ही अकॅडमीक कौन्सिल मधले…आम्ही व्यवस्थापन परिषदेतले…आम्ही स्थानिक…आम्ही विद्यार्थी…आम्ही संशोधक…आम्ही प्राध्यापक…आम्ही राजकीय वरदहस्त नसणारे…आम्ही परखड…आम्ही अन्यायाच्या विरोधात लढणारे…आम्ही बाबासाहेबांच्या मुशीतले…
आणि तुम्ही…
शिक्षण क्षेत्रातल्या मांडवलीतले…आर्थिक सत्तेच्या उलाढालीतले… आणि राजकारणातल्या कुशीतले तुम्हाला कायमचा सलाम… सलाम कुलगुरू महोदय, सलाम! जय महाराष्ट्र!
( या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची वैयक्तिक आहेत. न्यूजटाऊन त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.)