औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा निकाल किती वाजता कळणार? ६२४ कर्मचारी करणार २७ फेऱ्यांत मतमोजणी


छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने सज्जता केली असून ४ जून रोजी बीड बायपास रोडवरील एमआयटी कॉलेजमध्ये सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीच्या एकूण २७ फेऱ्या होणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी १०४ मतमोजणी कर्मचारी याप्रमाणे ६२४ कर्मचारी मतमोजणी करणार आहेत.

मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. बुधवारी त्यांनी सर्व सहायक निवडणtक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांसह सर्व व्यवस्थेची पाहणी केली.

मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले यादृच्छिकीकरण २७ मे रोजी झाले आहे. सोमवारी (३ जून) निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत दुसरे विधानसभा मतदारसंघनिहाय यादृच्छिकीकरण होईल. त्यानंतर मंगळवारी (४ जून) प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी तिसरे टेबलनिहाय यादृच्छिकीकरण होईल.

मतमोजणीचे वेळापत्रक

मंगळवारी (४ जून) पहाटे पाच वाजता तिसरे यादृच्छिकीकरण होईल. साडेसहा वाजता कर्मचारी त्यानुसार टेबलवर स्थानापन्न होऊन आपल्या साहित्याची तपासणी करतील. सकाळी ८ वाजता टपाली मतमोजणीची सुरुवात होईल. तसेच सकाळी साडेआठ वाजता मतदान यंत्रांची मतमोजणी सुरु होईल.

मतमोजणीवर निरीक्षकांची नजर

मतमोजणीसाठी दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात कन्नड, औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद(पश्चिम) या तीन विधानसभा क्षेत्रासाठी कांतीलाल दांडे हे भाप्रसेचे अधिकारी निरीक्षक असून औरंगाबाद(पूर्व),  गंगापूर आणि वैजापूरसाठी किशोरीलाल शर्मा हे निरीक्षक आहेत.

एका विधानसभेसाठी १४ टेबल व १०४ कर्मचारी

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात कन्नड, औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद(पश्चिम), औरंगाबाद(पूर्व), गंगापूर, वैजापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधासभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत.

 ७ टेबलची एक रांग अश्या दोन रांगा असतील. म्हणजे सहा विधानसभा क्षेत्रांसाठी ८४ टेबल असतील. एका टेबलवर रो ऑफिसर ते सारणी भरणारे चमू असे एकूण १०४ कर्मचारी नियुक्त असतील. तर टपाली मतांच्या मोजणीसाठी १० टेबल असून ६८ कर्मचारी नियुक्त आहेत.

मतमोजणी फेऱ्या किती?

विधानसभा मतदारसंघनिहाय असणाऱ्या मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील.

  • कन्नड- ३५९ मतदान केंद्र , २६ फेऱ्या.
  • औरंगाबाद (मध्य) ३१६ मतदान केंद्र, २३ फेऱ्या.
  • औरंगाबाद (पश्चिम) ३७४ मतदान केंद्र,२७ फेऱ्या.
  • औरंगाबाद(पूर्व) ३०५ मतदान केंद्र, २२ फेऱ्या.
  • गंगापूर ३४८ मतदान केंद्र, २५ फेऱ्या.
  • वैजापूर ३३८ मतदान केंद्र, २५ फेऱ्या.
    अशा एकूण २०४० मतदान केंद्रांसाठी सरासरी २७ फेऱ्या होतील. त्यामुळे फेरीनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी दुपारी १ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

विधानसभा क्षेत्रनिहाय रंग सांकेतांक

मतमोजणी सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय रंग सांकेतांक देण्यात आले आहेत. त्यात कन्नडला लाल, औरंगाबाद (मध्य)ला पिवळा, औरंगाबाद(पश्चिम)ला गुलाबी, औरंगाबाद(पूर्व)ला राखाडी, गंगापूरला जांभळा आणि वैजापूरला नारंगी रंग संकेतांक देण्यात आला आहे.

त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था

नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असून आतील व्यवस्था ही केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे असून त्याबाहेरील सुरक्षा राज्य राखीव पोलीस दलाकडे व बाह्य व्यवस्था राज्य पोलीस दलाकडे आहे. याशिवाय संपूर्ण मतमोजणी केंद्राचे ३६० अंशातून सीसीटीव्ही निगराणी होत आहे.

मोबाईलवर बंदी

मतमोजणी केंद्रात मोबाईल सह जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे. माध्यम प्रतिनिधींनाही निवडणूक आयोगाने दिलेले प्राधिकारपत्रे प्रवेशासाठी देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!