मुंबईः भाजपने यंदा ४०० पार असा नारा दिला आहे. त्यांनी ४०० जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा, अशा शब्दात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपवर टिकास्त्र सोडले.
मुंबईच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमोल किर्तीकर यांनी कोरोना काळात खिचडी वाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणात त्यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. अमोल किर्तीकर हे शिवसेनेच्या ठाकरे गटात असले तरी त्यांचे वडिल गजानन किर्तीकर हे शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत आपण महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करू, असे गजानन किर्तीकर यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र काल, १३ एप्रिल रोजी गोरेगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपवर टिकास्त्र सोडले.
शिवसेनेते मला ५७ वर्षे झाली. पण मी कधी लबाडी किंवा कपट-कारस्थान केले नाही. अमोल किर्तीकरांच्या विरोधात मी प्रचार करणार आहे, हे जाहीर केले होते. त्याप्रमाणे मी त्यांच्या विरोधात प्रचार करणारच आहे. पण अमोल किर्तीकर यांच्या विरोधात सुरू असलेल्या ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. खिचडी घोटाळ्यातून काहीही हाती लागणार नाही, हे ईडीचे अधिकारी खासगीत मान्य करतात, असे किर्तीकर म्हणाले.
भाजपने यंदा ४०० पारचा नारा दिला आहे. मोदींनी ४०० जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा. विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपने आणलेली नवी संस्कृती आहे, असेही किर्तीकर म्हणाले.
दरम्यान, गजानन किर्तीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला कशाचा धाक दाखवून भाजपने आपल्याबरोबर घेतले, याचा अनुभव गजानन किर्तीकर यांनी सांगितला आहे. गजाजन किर्तीकर यांचे म्हणणे फार महत्वाचे आहे. महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचे काम कसे झाले, हे किर्तीकर यांनी त्यांच्या शब्दात सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्राने त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे, आहे, असे पाटील म्हणाले.