परमिट रूम, रेस्टॉरंट, क्लबमध्ये मद्याचा आस्वाद घेणे महागले, व्हॅटमध्ये राज्य सरकारने केली दुपटीने वाढ


मुंबईः परमिट रूममध्ये विक्री करण्यात येणाऱ्या मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिणामी परमिट रूम, बार, रेस्टॉरंट, क्लब आणि कॅफेमध्ये जाणाऱ्या मद्यशौकीनांना आता मद्याचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. परमिट रूममधील मद्याच्या दरात वाढ होणार असली तरी स्टार हॉटेलमधील मद्याच्या दरावर मात्र या व्हॅट वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. राज्य सरकारने शुक्रवारी याबाबतचा निर्णय जारी केला.

१ नोव्हेंबरपासून व्हॅटमधील ही पाच टक्के दरवाढ लागू होणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार परमिट रूममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावर आता १० टक्के व्हॅट आकारला जाईल. आधी ५ टक्के व्हॅट आकारला जात होता. दुपटीने व्हॅट वाढवण्यात आल्यामुळे परमिट रूम, बार, रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये मद्याचा आस्वाद घेणे महागणार आहे.

दुसरीकडे या व्हॅट दरवाढीचा स्टार हॉटेलमधील मद्य विक्रीवर काहीही परिणाम होणार नाही. कारण स्टार हॉटेलमधील मद्यविक्रीवर आधीच २० टक्के व्हॅट आकारला जातो. त्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

परमिट रूमध्ये महागात मद्य मिळणार असल्यामुळे मद्यशौकीन आता पर्यायी मर्गांचा अवलंब करतील. ढाबे, इमारतीचे टेरेस, पार्क, समुद्र किनारे किंवा वाहने पार्क करून वाहनातच मद्याचा आस्वाद घेणे ग्राहक पसंत करतील, अशी शंका या व्यवसायातून बोलून दाखवली जात आहे.

परमिट रूममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील व्हॅट पाच टक्क्यांनी वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे परमिट रूमचालक मात्र नाराज झाले आहेत. राज्य सरकारकडून अबकारी परवाना शुल्क  वाढवल्यामुळे या व्यवसायावर ताण आलेला असताना पुन्हा व्हॅटमध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्यामुळे याचा व्यवसायावर प्रतिकुल परिणाम होणार असल्याचे बारचालकांचे म्हणणे आहे.

 पर्यटन आणि महसूल वाढीसाठी राज्याराज्यांमध्ये स्पर्धा सुरू असताना महाराष्ट्र सरकारने परमिट रूममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील व्हॅटमध्ये पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आपल्या उद्दिष्टांनाच धक्का पोहोचणार असल्याचेही परमिट रूमचालकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!