११ ऑक्टोबरपासून न्या. शिंदे मराठा आरक्षण समिती मराठवाडा दौऱ्यावर; मराठा-कुणबी, कुणबी-मराठ्यांचे पुरावे गोळा करणार


मुंबई: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

या दौऱ्यादरम्यान समितीचे अध्यक्ष व सदस्य   छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे

-समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. 

-जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात येणार आहे.

-१६ ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता समितीची बैठक होणार आहे.

-हिंगोली येथे दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होईल.

-नांदेड येथे दि. १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.

-२१ ऑक्टोबरला लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.

-धाराशिव(उस्मानाबाद) येथे दि.२२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक होणार आहे.

-बीड येथे दि. २३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!