
बीडः बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले असून देशमुख परिवाराने केलेल्या सात मागण्यांपैकी एक मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मस्साजोगचे ग्रामस्थ सात मागण्या घेऊन मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. त्यातील या प्रकरणाचा खटला लढवण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, ही प्रमुख मागणी आहे. राज्य सरकारने मस्साजोगच्या ग्रामस्थांची ही मागणी मान्य केली आहे.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ऍड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. सोबतच फडणवीस यांनी निकमांच्या नियुक्तीचा आदेशही शेअर केला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीने प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या सात मागण्या होत्या, त्यापैकी एक मागणी मान्य झाली आहे. या प्रकरणात बाळासाहेब कोल्हे यांची देखील सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे आधीच एक प्रकरण आहे. त्यामुळे याबाबत गावकऱ्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यामुळे सगळ्या आरोपींना फासावर लटकवण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. आम्हाला न्याय मिळण्यासाठी जे करणे शक्य आहे, ते मी करणार आहे. कारण माझे वडिल माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही, असे वैभवी देशमुख म्हणाली.
निकम म्हणालेः मी राजकारणात तरीही…
दरम्यान, या नियुक्तीवर उज्ज्वल निकम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना निकम म्हणाले की, माझ्या नियुक्तीनंतर राजकीय पडसाद उमटतील याची मला आधीच कल्पना होती. मुख्यमंत्र्यांनाही मी हे सांगितले होते. मी राजकारणात कधीही सक्रीय नव्हतो. राजकारणात आता आलो असलो तरीही माझ्या कर्तव्यात कधीही, कुणीही आडवा येऊ शकत नाही. त्यामुळे मी त्याच जोमाने या प्रकरणात लक्ष घालेल, असे निकम म्हणाले.
अन्य सहा मागण्या अशा
मस्साजोगचे ग्रामस्थ सात मागण्या घेऊन मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. त्यात प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, एसआयटीमध्ये दोन सायबर सेल तज्ज्ञ द्या, आरोपींचे गेल्या दोन महिन्यांतील सीडीआर तपासा, कृष्णा आंधळे अत्यंत चलाख असून त्याला अटक करा, दिलीप गिते, गोरख फड, दत्ता बिकडचे सीडीआर तपासा आणि त्यांना सहआरोपी करा, आरोपींना व्हीआयपीसारखी वागणूक देणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, अशा मागण्यांचा समावेश आहे.
