‘…तर तुमचे तुकडेही सापडणार नाहीत,’ संस्थाचालकांनी धमकावले आणि जिवाच्या भीतीने प्राध्यापकांनी कॉलेजचे तोंड पाहणेच सोडले!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  उच्च शिक्षण क्षेत्रात संस्थाचालकांचे गुंडाराज सुरू झाले आहे की काय?  अशी शंका उपस्थित व्हावी, अशीच काहीशी परिस्थिती मराठवाड्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रात दिसू लागली आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी नॅक मूल्यांकनासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची ‘खंडणी’ देण्यास नकार देणाऱ्या प्राध्यापकांना ‘तुम्ही पैसे दिले नाही तर माझ्या लहान भावाला सांगून तुमचा बंदोबस्त करतो… तुमचे तुकडेही सापडणार नाहीत…’ अशा ‘भाई स्टाइल’ शब्दांत धमकी दिली. या धमकीमुळे संस्थाचालक आपला कधीही काटा काढू शकतो, अशी शंका येऊन या महाविद्यालयातील ८ प्राध्यापकांनी गेल्या सात दिवसांपासून महाविद्यालयात जाणेच बंद करून टाकले आहे.

 बाहेगव्हाण येथील साहेबराव मस्के पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे वडवणी येथे वैष्णवी महाविद्यालय हे अनुदानित महाविद्यालय आहे. डॉ. संजय मस्के हे संस्थेचे अध्यक्ष तर डॉ. रणजित मस्के हे संस्थेचे सचिव आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या संस्थाचालकांकडून गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचा प्रचंड आर्थिक आणि मानसिक छळ सुरू आहे.

हेही वाचाः वडवणीच्या वैष्णवी महाविद्यालयात प्राध्यापकांकडून सहसंचालकांच्या नावानेच  खंडणी वसुली, तंगडे तोडीच्या धमक्यांमुळे गुरूजी भयभीत!

गेल्या दोन महिन्यांपासून महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थाचालकांनी महाविद्यालयातील एकाही कर्मचाऱ्याला हजेरीपटावर स्वाक्षरी करू दिलेली नाही. हे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयात येतात खरे, परंतु हजेरीपटावर स्वाक्षरीच करू न दिल्यामुळे ते ‘तांत्रिकदृष्ट्या’ महाविद्यालयात गैरहजरच दाखवले जातात.

२६ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मस्के यांनी सर्व प्राध्यापकांना बोलावून घेतले. सर्व प्राध्यापकांकडून त्यांचे मोबाइल काढून घेण्यात आले आणि नॅक मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये द्या, अशी मागणी केली. डॉ. संजय मस्के एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे जाऊन या प्राध्यापकांना ‘भाई स्टाइल’ धमकावले.

‘संस्थेच्या सचिवाची (डॉ. रणजित मस्के) एँजिओग्राफी झालेली आहे. तुम्ही पैसे न दिल्यामुळे त्यांना काही झाल्यास मी तुम्हाला जबाबदार धरेल. माझ्या लहान भावाला सांगून तुमचा बंदोबस्त करतो, अशा शब्दांत त्यांनी प्राध्यापकांना धमकावले. तुम्ही पैसे दिले नाही तर विजे मारीन’, अशी धमकीही त्यांनी दिल्याचे या महाविद्यालयाच्या आठ प्राध्यापकांनी बीडच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

संस्थेचे अध्यक्ष संजय मस्के यांचे धमकावून झाल्यानंतर संस्थेचे सचिव रणजित मस्के यांनी काही प्राध्यापकांना त्यांच्या होंडा शोरूममध्ये बोलावून घेतले आणि तेथे गेलेल्या प्राध्यापकांना त्यांनी ‘तुमचे तुकडे पण सापडणार नाहीत,’ अशा शब्दांत धमकावले.

संस्थाचालकांकडून होत असलेला आर्थिक आणि मानसिक छळ तसेच मिळणाऱ्या जिवे मारण्याच्या धमक्या यामुळे वैष्णवी महाविद्यालयातील आठ प्राध्यापकांनी महाविद्यालयात जाणेच बंद केले आहे. आधी त्यांनी राज्याचे उच्च शिक्षण संचालक, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहसंचालक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे लेखी तक्रार केली. आज त्यांनी थेट बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार दिली आहे.

संस्थाचालकांकडून देण्यात येत असलेल्या धमक्यांमुळे प्राध्यापकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमचे व आमच्या कुटुंबाचे मनोबल खचले आहे. आम्हास व आमच्या कुटुंबास काही हानी झाल्यास त्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मस्के, सचिव डॉ. रणजित मस्के आणि महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील, असे या प्राध्यापकांनी पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीवर वैष्णवी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जी.जे. दुबाले, डॉ. जी. व्ही. शित्रे, प्रा. पी.आर. शेंडगे, प्रा. के.व्ही. केळे, डॉ. सौ. आर. एल. चौधरी, प्रा. एम.बी. सोळंके, प्रा. एल.एन. चव्हाण आणि डॉ. डी.ए. खोसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!