
मुंबई: चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे महत्वाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. वाजवी संशय घेण्यासारखी पुरेशी कारणे असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला आरोपी करू नका, असे निर्देशही न्या. सारंग कोतवालआणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने दिले.
दिशा सालियन हिने आत्महत्या केली नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप करत दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि दिशाच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली होती. घटनेनंतर अनेक प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी घाईघाईत तपास बंद केला. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत नव्याने चौकशी करावी, अशी सतीश सालियन यांची मागणी होती.
दिशाचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला, त्या परिस्थितीशी संबंधित सर्व पैलूंचा सीबीआयने सखोल तपास करावा, मात्र विरोधात पुरेसे पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला आरोपी करू नका, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले. तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे वाजवी संशय निर्माण करणारी पुरेशी कारणे असल्याची खात्री तपास अधिकाऱ्याला पटेपर्यंत कोणालाही आरोपी मानले जाणार नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने अनुभवी ज्येष्ठ अधिकाऱ्याची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, तपास अधिकाऱ्याने सतीश सालियान यांचा जवाब नोंदवून एफआयआर दाखल करावा, तपासाअंती गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाल्यास किंवा गुन्हा घडला नसल्याचेही स्पष्ट झाल्यास तसा अहवाल न्यायालयात दाखल करावा, त्या परिस्थितीत त्या अहवालाला आव्हान देण्याची संधी सतीश सालियान यांना असेल, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सतीश सालियन यांनी ऍड. निलेश ओझा यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत शिवसेना नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ८ जून २०२० रोजी दिशाच्या मालवणी येथील निवासस्थानी तिच्या जवळच्या मित्रांसह पार्टी सुरू होती. अचानक शिवसेनेचे नेते आ. आदित्य ठाकरे, त्यांचे अंगरक्षक, अभिनेता सूरज पांचोली आणि डिनो मारिया तेथे आले. त्यांनी दिशावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिचा खून केला, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता.
या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून सालियन यांच्या याचिकेवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले.
राजकीय सूडबुद्धीने या प्रकरणात आपले नाव गोवण्यात आले आहे. या याचिकेत निव्वळ राजकीय हेतूने आपले नाव घेण्यात आले आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून या प्रकरणी कारवाई करणे योग्य होणार नाही. याचिकाकर्ते सतीश सालियन यांच्या बाबतीत मला पूर्ण सहानुभूती आहे, परंतु दिशा सालियन मृत्यू प्रकरणी राजकारण थांबायला हवे, असे म्हणणे आदित्य ठाकरे यांनी ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांच्यामार्फत उच्च न्यायालयात मांडले. तेव्हा राजकीय चर्चेशी उच्च न्यायालयाला काहीही घेणे देणे नाही, सत्य बाहेर यावे एवढाच उद्देश असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
