आगाऊपणा भोवलाः वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन, डॉ. पांढरीपांडेंची स्वतंत्र समिती ठरवणार स्वायत्त महाविद्यालयांसाठी नियमावली


छत्रपती संभाजीनगर: नुकतीच स्वायत्तता मिळालेल्या आणि स्वायत्तेच्या नावाखाली मनमानी कारभार चालवल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या चौकशीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने माजी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिदस्यीय समिती स्थापन केली आहे.
दरम्यान, वसंतराव नाईक महाविद्यालय व्यवस्थापनाच्या आगाऊपणामुळे स्वायत्तता घेतलेली सर्वच महाविद्यालयेही विद्यापीठाच्या रडारवर आली असून विद्यापीठाने स्वायत्त महाविद्यालयांची कार्यपद्धती व नियमावली ठरविण्यासाठी माजी कुलगुरू डॉ.विजय पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापना केली आहे. सध्या स्वायत्तता घेतलेल्या पाच महाविद्यालयांना भेट देऊन सदर समिती आपला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या व शैक्षणिक स्वायत्तता घेतलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालयातील तक्रारी संदर्भात सत्यता तपासण्यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या आदेशावरून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. यापूर्वी स्वायत्त झालेल्या पाच महाविद्यालयासंदर्भातही नियमावली ठरवण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे.

हेही वाचाः ‘स्वायत्त दर्जा’ मिळताच संस्थाचालकांच्या अंगात मस्तीः वसंतराव नाईक महाविद्यालयातील तब्बल १५ प्राध्यापकांविरुद्ध बडतर्फीची ‘घाऊक’ कारवाई!
आजपर्यंत शैक्षणिक स्वायत्तता (Academic Autonomy) घेतलेल्या महाविद्यालयांमध्ये पाच शिक्षण संस्थांचा समावेश आहे. यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, एमआयटी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व वसंतराव नाईक महाविद्यालयाचा समावेश आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयानी आतापर्यंत शैक्षणिक स्वायत्तता घेतलेली आहे. तथापि दैनंदिन कामकाज करताना विविध अडचणी येत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कार्यपद्धती स्पष्ट होत नसल्यामुळे कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सदर समिती गठीत करण्यात आली आहे. या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी व कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता तसेच नियमावली तयार करण्यासाठी ही समिती काम करणार आहे.

हेही वाचाः वसंतराव नाईक महाविद्यालयाला दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांकांची ऍलर्जी; विद्यापीठ नामविस्तार दिन, रमजान ईदसह ११ सार्वजनिक सुट्ट्यांना मनमानी कात्री!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.विजय पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत माजी प्रकुलगुरु डॉ. अशोक तेजनकर हे सदस्य आहेत. या समितीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. डंभारे, कराडच्या एसजीएम महाविद्यालाचे यडॉ. चंद्रकांत खिल्लारे, कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाचे डॉ. रमेश कुंभार हे सदस्य असून मानव्यविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. धनश्री महाजन या सदस्य सचिव असणार आहेत. ही समिती या पाचही महाविद्यालयांना भेट देऊन आपला अहवाल कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना अहवाल सादर करणार आहे.

हेही वाचाः वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची निवड प्रक्रियाच बोगस, प्रचलित नियम धाब्यावर बसवून ‘अपात्र’ डॉ. संजीव रेड्डींची ‘मागच्या दारा’ने नियुक्ती!

डॉ. शिरसाठ समिती घेणार नाईक महाविद्यालयाची झाडाझडती

छत्रपती संभाजीनगर येथील नितीन राठोड सचिव असलेल्या वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारींची सत्यता तपासण्यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या आदेशावरून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. लोकप्रशासन विभागाचे प्रमुख तथा माजी प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत वाणिज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सय्यद अझरुद्दीन व संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सचिन देशमुख यांचा समावेश करण्यात आलेला आहे, असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!