१ मे रोजी शाळांचा निकालः आता प्रगतीपुस्तकासोबतच पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही दाखवणे अनिवार्य, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय


पुणेः महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा निकाल जाहीर करताना आता विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकासोबतच त्याच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी यावर्षीच्या १ मेपासूनच केली जाणार आहे.

दरवर्षी १ मे रोजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे निकाल जाहीर केले जातात. या दिवशी विद्यार्थी व पालकांना विद्यार्थ्याचे प्रगतीपुस्तक देण्यात देते. प्रगतीपुस्तकावरून पालकांना आपल्या पाल्याची गुणवत्ता निदर्शनास येते. परंतु यावर्षीपासून शालेय शिक्षण विभागाने प्रगतीपुस्तकासोबतच पालकांना त्यांच्या पाल्यांच्या उत्तरपत्रिकाही दाखवणे अनिवार्य केले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखणे आणि त्या क्षमतांचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षक व पालकांचे संयुक्त कर्तव्य ठरवण्यात आले आहे. या संयुक्त कर्तव्याचा एक भाग म्हणून शालेय शिक्षण विभागाने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे.

आता निकाल देताना केवळ प्रगतीपुस्तक न देता विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे, तसे आदेशच शिक्षण आयुक्तांनी जारी केले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवल्यामुळे पालकांना आपल्या पाल्याची संकल्पनात्मक समज, उत्तरे लिहिण्याचे कौशल्याचे आकलन होण्याबरोबरच नेमक्या चुका कोठे होत आहेत, याचेही अचूक निदान करता येईल. केवळ गुणांवर लक्ष केंद्रित न करता पाल्यांच्या कौशल्यांवर आधारित प्रगती मोजणे शक्य होईल, असा हा निर्णय घेण्यामागचा मुख्य हेतू आहे.

पालकांना उत्तरपत्रिका दाखवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कच्चा दुव्यांवर पालकांच्या मदतीने घरच्याघरी उपाययोजना करणे सोपे होईल. पाल्याच्या अभ्याच्या सवयी, वाचन आणि लेखनाबाबत पालक अधिक सजग व जबाबदारी होतील. मूल्यमापनाच्या प्रक्रियेबाबत पालकांचा विश्वास वाढेल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ चित्र समोर येईल, हे या निर्णयाचे फायदे असल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

या निर्णयामुळे पालकांना आपल्या मुलाने परीक्षेत नेमकी काय उत्तरे लिहिली आणि शिक्षकांनी ती कशी तपासली? हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या स्वाक्षरीने हा निर्णय जारी करण्यात आला असून राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांना या सूचनांचे अनिवार्यपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर २ मेपासून राज्य मंडळाच्या सर्व शाळांना अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!