मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकीकडे राज्याचे राजकीय वातावरण तापत चालले असतानाच महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्णतेचाही तडाखा वाढला आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसत असून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे तर राज्यात ३३ जणांना उष्माघाताचा फटका बसला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्याच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात उन्हाचा तडाखा असे संमिश्र वातावरण राज्यात अनुभवायला मिळत आहे. यंदा मार्च महिन्यात राज्यभरात ३३ जणांना उष्माघाताचा फटका बसला असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतींसह विविध स्थानिक स्वराज संस्थांना पाठवण्यात आली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात पहिला बळी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यालाही उन्हाचा तडाखा बसत आहे. जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. वाढत्या तापमानाचा फटका बसून जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील गणेश राधेश्याम कुलकर्णी या तरूणाचा मृत्यू झाला आहे.
गणेश हा बिडकीन येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. तो जौनपूरमार्गे बिडकीनला जात असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला. त्यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला. त्याला तातडीने बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
विदर्भासह ‘या’ सात जिल्ह्यात उष्णतेची लाट
अकोला, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाच्या बहुतांश भागात मंगळवारपासून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे विदर्भातील कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
आठवडाभरात होणार डेथ ऑडिट
राज्यात उष्माघातामुळे होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी आरोग्य विभागाने यंदा फेब्रुवारी महिन्यातच कृती आराखडा तयार केला आहे. आरोग्य यंत्रणेलाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. उष्णतेच्या लाटेच्या काळात लोकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्या भागात उष्णतेच्या विकाराचे प्रमाण वाढलेले आढळेल त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जातील. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे जिल्हास्तरीय समितीकडून एका आठवड्यात डेथ ऑडिट करण्याचे आदेशही आरोग्य विभागाने दिले आहेत.