राज्यात २४ एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, वाचा तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?


मुंबई: भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

२१ एप्रिलः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली,  नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर वर्धा, अमरावतीत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२२ एप्रिलः जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट, आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे तर अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.  मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अशीच परिस्थिती २३ आणि २४ एप्रिल रोजीही राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले असून काही सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. त्या अशा-

नागरिकांसाठी सूचना: विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विज चमकताना दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.

प्रशासनासाठी उपाययोजना: ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत. शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात. हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावेत.

विशेष सूचना: शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत. बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे. तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!