
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): ‘रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता’, अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. अतिवृष्टीमुळे गारद झालेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर तब्बल २० टक्क्यांपर्यंत शुल्कवाढीचा भूर्दंड टाकण्याचा निर्णय घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेने याच म्हणीची प्रचिती दिली असून शुल्कवाढीच्या या निर्णयाला सर्वच थरातून विरोध होण्याची शक्यता आहे.
यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे ३८ लाख हेक्टरवरील शेती पिके मातीमोल झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. या जमिनी पुन्हा सुपीक करण्यासाठी आणखी किमान ५ ते ७ वर्षे मेहनत घ्यावी लागणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यातच १७ लाख ७७ हजार ८७४.७८ हेक्टरवरील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीच्या या अस्मानी संकटामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरता हतबल झालेला असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आज झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाशी सर्व संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसरातील विविध विद्याशाखानिहाय अभ्यासक्रमांचे शैक्षणिक व प्रयोगशाळा शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जे शुल्क आकारण्यात येत होते, त्या शुल्कावर शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षणाच्या ग्रेडनुसार शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ए प्लस प्लस, ए प्लस व ए ग्रेड मिळालेल्या महाविद्यालयांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कात २० टक्के तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कात १० टक्के शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ज्या महाविद्यालयांना बी प्लस प्लस, बी प्लस व बी ग्रेड मिळालेल्या आहे, त्या महाविद्यालयांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कात १५ टक्के तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कात ७ टक्के आणि सी ग्रेड मिळालेल्या महाविद्यालयांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कात १० टक्के तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कात ५ टक्के शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे ‘नो ग्रेड’ श्रेणीतील महाविद्यालयांना कोणतीही शुल्क वाढ न देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
प्रजा संकटात असताना शासकाने संवेदनशीलपणे तिला मदतीचा हात देणे अपेक्षित असताना शासक जर असंवेदनशीलपणे प्रजेच्या जखमेवर मीठ चोळत आपले मनोरंजन करण्यात किंवा खिसे भरण्यात मश्गुल असेल तर त्या परिस्थितीचे चपखल वर्णन करण्यासाठी ‘रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता’ या प्रसिद्ध म्हणीचा उपयोग केला जातो. मराठवाड्यातील शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांची मुले असलेल्या विद्यार्थ्यांचे अतिवृष्टीच्या अस्मानी संकटामुळे कंबरडे मोडलेले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेने घेतलेला २० टक्क्यांपर्यंत शुल्कवाढीचा निर्णय निरोच्याच असंवेदनशीलतेची प्रचिती देणारा असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे.
५० हजारांचे पाकिट आणि अकॅडमिक ग्रेड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण करण्यासाठी पाठवलेल्या समित्यांनी पाकिटे घेऊन ग्रेड दिल्याचा मुद्दा एका संस्थाचालकाने थेट कुलगुरूंची भेट घेऊन ‘५० हजार रुपयांचे पाकिट घेऊनही समितीने आपले महाविद्यालय ‘नो ग्रेड’मध्ये टाकल्या’ची तक्रार केल्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. जी महाविद्यालये ‘नो ग्रेड’ श्रेणीमध्ये आहेत, त्यांचे प्रस्ताव २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या छानणी समितीसमोर सादर केले जाणार आहेत.
या छानणी समितीत या महाविद्यालयांच्या ग्रेडमध्ये वाढ झाली तर त्या महाविद्यालयांनाही शुल्कवाढीचा लाभ मिळणार आहे. आता ज्या संस्थाचालकाने ’५० हजार रुपयांचे पाकिट देऊनही नो ग्रेड’ दिल्याची तक्रार केली होती, त्याच्या महाविद्यालयाचा ग्रेड या छानणी समितीत वाढतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
