
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सदस्य नोंदणी मोहिमेला विरोध करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्याच विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे आंबेडकरी जनतेत प्रचंड असंतोष उफाळून आला असून पोलिसांच्या या कारवाईचा निषेध आणि आरएसएसवर बंदीच्या मागणीसाठी आज सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरएसएसच्या कार्यालयावर प्रचंड जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला कायदेशीर परवानगी नाकारलेली असतानाही पोलिसांचा मनाई आदेश झुगारून निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी शहर दणाणून सोडले.
छत्रपती संभाजीनगरातील शासकीय तंत्रनिकेतन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विनापरवानगी सुरू केलेली सदस्य नोंदणी मोहीम उधळून लावणाऱ्या दोन आंबेडकरी कार्यकर्त्यांवर उस्मानपुरा आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यातूनच आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी पुढे आली आहे. आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी काल सर्व आंबेडकरी पक्ष/संघटनांच्या वतीने क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली होती. तर आज युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून समर्थनगरातील प्रल्हाद भवन येथे असलेल्या आरएसएसच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारूनही मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम राहिल्यामुळे रॅपीड ऍक्शन फोर्सच्या तुकडीसह क्रांतीचौक आणि आरएसएसच्या कार्यालयाबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केले होते. हा मोर्चा शांततेच्या मार्गानेच निघेल, आम्ही संविधान मानणारे लोक आहोत, या मोर्चात कायद्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही, असे सुजात आंबेडकर यांनी जाहीर केले. हा मोर्चा अडवण्यासाठी पोलिसांनी क्रांतीचौक, जालना रोड, विवेकानंद महाविद्यालयाजवळील चौक तसेच आरएसएसच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेडिंग केले होते.
आरएसएस मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी मोर्चेकऱ्यांनी शहर दणाणून सोडले. हातामध्ये तिरंगा ध्वज, निळे झेंडे आणि वंचित बहुजन आघाडीचे झेंडे हातात घेऊन क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर पोलिसांनी अडवला. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांत चर्चा झाली.
आरएसएसने भारताच्या तिरंग्याचा सन्मान करावा, भारताच्या संविधानानुसार महाराष्ट्र सार्वजनिक संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी करावी यासाठी आरएसएसच्या कार्यालयात जाऊन आम्हाला तिरंगा झेंडा, भारताचे संविधान आणि महाराष्ट्र सार्वजनिक संस्था नोंदणी कायद्याची प्रत द्यायची आहे, असे पोलिसांना सांगितल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, शमिभा पाटील आणि अमित भुईगळ यांना पोलिसांच्या वाहनातून विवेकानंद महाविद्यालयापर्यंत नेण्यात आले आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी आणलेले हे गिफ्ट स्वीकारण्यासाठी या असा निरोप पोलिसांकडून आरएसएसच्या कार्यालयात पोहोचवण्यात आला.
परंतु वंचितने आणलेले गिफ्ट स्वीकारण्यासाठी आरएसएसचा एकही कार्यकर्ता पुढे आला नाही. त्यामुळे हे गिफ्ट आमच्याकडे द्या, आम्ही आरएसएसच्या कार्यालयात पोहोचवू, अशी विनंती पोलिसांनी केल्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडेच तिरंगा ध्वज, भारताचे संविधान आणि महाराष्ट्र सार्वजनिक संस्था नोंदणी कायद्याची प्रत स्वाधीन करण्यात आली. या मोर्चात शमिभा पाटील, फारूख अहमद, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगळ, सतीश शिंदे, अफसर खान, पंकज बनसोडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे राज्यभरातील पदाधिकारी आणि विविध आंबेडकरवादी पक्ष/संघटनांचे नेते व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आरएसएस ही दहशतवादी संघटना
ज्या संघटनेचे स्वतःचीच नोंदणी नाही तर सदस्य नोंदणी कशी करता? नोंदणीच नसताना वर्गणी गोळा कशी करता? गोळा केलेल्या वर्गणीचा हिशेब देता का? वर्गणीतून मिळालेल्या उत्पन्नाचा प्राप्तिकर भरता का? असे सवाल सुजात आंबेडकर यांनी केले आणि तुम्ही नोंदणीकृत असाल तर कोणत्या कायद्यानुसार नोंदणीकृत आहात, त्याची कागदपत्रे दाखवा, असे आव्हानच त्यांनी आरएसएसला दिले. आरएसएसच्या दसरा पुजनात केवळ भारताच्या लष्कराकडे असलेल्या शस्त्रांची पूजा केली जाते. ही शस्त्रे बेकायदेशीरपणे बाळगणारी आरएसएस दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे आरएसएसवर तत्काळ कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही सुजात आंबेडकर यांनी केली. आरएसएसला झुकवून संविधानाच्या मार्गावर चालायला लावण्याची ताकद फक्त देशातील आंबेडकरी जनतेमध्येच आहे, असेही सुजात आंबेडकर म्हणाले.
