
मुंबईः भारतीय विशिष्ट ओळक प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधार कार्ड अद्यतनीकरण सेवांच्या शुल्कात ५० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून या सेवांचे सुधारित दर लागू झाले असून यूआयडीएआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. कोणत्याही शासकीय सेवा अथवा योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड मागितले जाते. एकदा काढलेले हे आधार कार्ड अद्ययावत ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या प्रमुख दस्तऐवजांपैकी एक महत्वाचा दस्तऐवज ठरलेल्या आधार कार्ड अद्यतनीकरण सेवांच्या शुल्कात यूआयडीएआयने १ ऑक्टोबरपासून ५० टक्क्यांपर्यंत वाढ केली असून त्याचा मोठा भूर्दंड विद्यार्थी, शेतकरी, लाडक्या बहिणींसह सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.
यूआयडीएने लागू केलेले नवीन दर ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत लागू असतील. आधार नोंदणी पूर्वीप्रमाणेच मोफत ठेवण्यात आली आहे. ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक अद्यतनीकरणही मोफत ठेवण्यात आले आहे. मात्र इतर बायोमेट्रिक अद्यतनीकरणाचे शुल्क ७५ रुपये करण्यात आले आहे. पूर्वी हे शुल्क ५० रुपये होते. पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा, दस्तऐवज अद्यतनीकरण करण्यासाठी आधार केंद्र किंवा ऑनलाइन पोर्टलवरील शुल्क ५० रुपयांऐवजी आता ७५ रुपये करण्यात आले आहे.
ई-केवायसी, आधार शोध व आधार कार्डची रंगीत प्रिंट काढण्याचे शुल्कामध्ये वाढ करण्यात आली असून हे शुल्क आता ३० रुपयांवरून ४० रुपये करण्यात आले आहे. यूआयडीएने आधार कार्ड अद्यतनीकरणाच्या शुल्कात २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ केल्यामुळे सर्वसमान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भूर्दंड पडला आहे.
…तर आधार केंद्र चालकांवर कठोर कारवाई
यूआयडीएआयने निश्चित केलेल्या सुधारित दरांचे फलक आधार केंद्राच्या दर्शनी भागावर स्पष्टपणे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या यूआयडीएआयने निश्चित केलेल्या शुल्काशिवाय आधार केंद्र चालकांनी अतिरिक्त शुल्क आकारल्यास अशा आधार केंद्रांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात इशारा यूआयडीएआयने दिला आहे. आधार केंद्र चालकांबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्यास संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार शाखेत तक्रारी दाखल करता येतील.
