
नवी दिल्लीः आजपासून देशात अनेक महत्वपूर्ण आर्थिक आणि नियामक बदल लागू होत आहेत. त्याचा करदाते, बँक ग्राहक आणि रेल्वे प्रवाश्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. या बदलांमध्ये प्राप्तिकर परतावा (आयटीआर) दाखल करण्याच्या कालावधीच्या मुदतीत वाढ, पॅन कार्डसाठी आधार सत्यापनाची अनिवार्यता, तत्काळ रेल्वे तिकिट बुकिंगसाठी नवे नियम आणि एटीएम व्यवहारावरील वाढीव शुल्काचा समावेश आहे.
प्राप्तिकर रिटर्न आता १५ सप्टेंबरपर्यंत
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्राप्तिकर रिटर्न (आयटीआर) दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवून ३१ जुलैऐवजी १५ सप्टेंबर २०२५ केली आहे. या मुदतवाढीमुळे करदात्यांना आपले वित्तीय दस्तावेज तयार करण्यासाठी आणि रिटर्न दाखल करण्यासाठी ४६ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
पॅन कार्डसाठी आधार सत्यापन अनिवार्य
१ जुलै २०२५ पासून नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार सत्यापन अनिवार्य करण्यात आले आहे. याआधी अर्जदार मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र अथवा अन्य दस्तावेजांचा वापर करत होते. परंतु आता पारदर्शकता आणि डिजिटलीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आधार सत्यापन अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यमान पॅन कार्डधारकांनाही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन कार्डला आधार लिंक करावे लागणार आहे. अन्यथा त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते.
तत्काल रेल्वे तिकिट बुकिंगसाठी नवीन नियम
भारतीय रेल्वेने तत्काल टिकिट बुकिंगसाठी नवीन नियम लागू केले आहेत. १ जुलैपासून आयआरसीटीसीची वेबसाईट अथवा ऍपच्या माध्यमातून तत्काल रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी आधार सत्यापन अनिवार्य करण्यात आले आहे. शिवाय १५ जुलैपासून सर्व तत्काल बुकिंगसाठी (ऑनलाइन आणि काऊंटर) आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सत्यापन अनिवार्य असेल. रेल्वेने अधिकृत एजंटांसाठी तत्काल बुकिंग सुरू झाल्यानंतर ३० मिनिटे प्रतिबंध घातला आहे. जास्तीत जास्त प्रवाशांना थेट तत्काल तिकिटे मिळावीत, हा त्या मागचा हेतू आहे.
एटीएम व्यवहारावर शुल्क वाढ
देशातील प्रमुख बँकांनी एटीएम व्यवहारावरील शुल्कात बदल केला आहे. आयसीआयसी बँकेत पहिले पाच मासिक विथड्रॉल मोफत असतील. त्यानंतरच्या प्रत्येक विथड्रॉलसाठी २३ रुपये शुल्क आकारले जाईल. बिगर मेट्रो शहरात पाच मोफत देवाणघेवाण आणि मेट्रो शहरात तीन मोफत व्यवहारानंतरच्या प्रत्येक वित्तीय व्यवहारावर २३ रुपये आणि बिगर वित्तीय व्यवहारावर ८ रुपये ५० पैसे शुल्क लागेल. ऍक्सिस बँकेनेही बिगर नेटवर्क विथड्रॉलसाठी प्रत्येक व्यवहारावर २३ रुपये शुल्क लागू केले आहे.
रेल्वे भाड्यात वाढ
भारतीय रेल्वेने १ जुलैपासून रेल्वे भाड्यात वाढीची घोषणा केली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सेकंड क्लास श्रेणीच्या सामान्य भाड्यात ०.५ पैसे प्रतिकिलोमीटर मेल/ एक्स्प्रेस रेल्वेच्या भाड्यात १ पैसा प्रतिकिलोमीटर आणि वातानुकुलित श्रेणीच्या भाड्यात २ पैसे प्रतिकिलोमीटर वाढ केली आहे. उपनगरी रेल्वे आणि सीजन तिकिटाच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
क्रेडिट कार्ड व अन्य शुल्कात बदल
एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरणे, १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे वॉलेट रिलोड, ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीचे उपयोगिता बिल आणि १० हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या गेमिंग खर्चावर १ टक्का शुल्क लागू केले आहे. आयसीआयसीआय बँकेने आयएमपीएस शुल्क आणि रोख जमा/ विथड्रॉवरही नवीन शुल्क लागू केले आहे.
