कोहिनूर महाविद्यालयातील ‘चारसौ बीसी’ प्रकरणात डॉ. मझहर खान आणि आस्मा खानसह सहा जणांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान आणि सचिव आस्मा खान यांनी एम.ए. हिंदी पाठ्यक्रमाचे पेपर दुसऱ्यांकडूनच सोडवून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून (वायसीएमओयू) चालढकल करत आज अखेर सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु ही चालढकल करण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध मुक्त विद्यापीठ काय कारवाई करणार? हा खरा प्रश्न आहे.

खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र व परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर जानेवारी महिन्यात झालेल्या एम. ए. हिंदी पाठ्यक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेत कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान व सचिव आस्मा खान यांनी आपल्याच महाविद्यालयातील कर्मचारी फेरोज शेख आणि बाळू भोपळे यांच्याकडून सर्वच्या सर्व पेपर लिहून घेऊन विद्यापीठाची फसवणूक केली होती.

हेही वाचाः कोहिनूरमधील ‘चारसौ बीसी’प्रकरणातील आरोपींना मुक्त विद्यापीठाकडून ‘अभय?, खुलताबादेत फिर्याद न देता छावणीत दिले पत्र; अद्याप एफआयआर नाही!

परीक्षेशी संबंधित असलेल्या या अत्यंत संवेदनशील प्रकरणात कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सत्यशोधन समिती स्थापन केली. या समितीच्या सत्यशोधनात डॉ. मझहर खान व आस्मा खान, फेरोज शेख, बाळू भोपळे आणि त्यांना मदत करणारे शेख बादशहा आणि परीक्षा प्रमुख शेख लईख हे दोषी असल्याचे निष्पन्न झाले. सत्यशोधन समितीने आपला अहवाल कुलगुरू डॉ. सोनवणे यांच्याकडे सोपवून २३ दिवस उलटले तरी याप्रकरणातील दोषींविरुद्ध अद्याप कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याचे वृत्त न्यूजटाऊनने ३१ मे रोजी प्रसिद्ध केले होते.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील ‘चारसौ बीसी’ प्रकरणी मुक्त विद्यापीठाचे चौकशीचे गुऱ्हाळ संपेना, चार महिने उलटले तरी कारवाईचा पत्ता नाही!

न्यूजटाऊनच्या वृत्तानंतर मुक्त विद्यापीठाचे प्रशासन हालले आणि कुलसचिव दिपील भरड यांनी छावणी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नावे २ जून रोजी एक पत्र आवक विभागात दाखल केले. हे पत्र म्हणजे फिर्याद नव्हती तर सत्यशोधन समितीने कोणत्या शिफारशी केल्या आणि एफआयर नोंदवण्यासाठी सहायक कक्ष अधिकारी सतीश बोरसे यांना विद्यापीठातर्फे प्राधिकृत करण्यात आल्याची माहिती देणारे साधे पत्र होते.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रावर कायमस्वरुपी बंदी, न्यूजटाऊनच्या दणक्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा मोठा निर्णय!

या पत्रासोबतच खरे तर मुक्त विद्यापीठाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने कायदेशीर फिर्याद नोंदवणे आवश्यक होते. त्याशिवाय कुठलाही एफआयआर दाखल होणार नाही, हे माहीत असूनही मुक्त विद्यापीठाकडून या पत्रासोबत किंवा पत्र दिल्याच्या किमान दुसऱ्या दिवशीही फिर्यादच देण्यात आली नाही. परिणामी या प्रकरणात चार दिवस उलटले तरी कोणताही एफआयआर होऊ शकला नव्हता.

हेही वाचाः कोहिनूरच्या अध्यक्षांची ‘चारसौ बीसी’: मुक्त विद्यापीठाच्या स्वतःच्याच परीक्षा केंद्रावर प्राध्यापकांवर दबाव टाकून सोडवून घेतले स्वतःचे एमए हिंदीचे पेपर!

अखेर आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्राधिकृत केलेले सहायक कक्ष अधिकारी सतीश रामचंद्र बोसरे यांनी खुलताबाद पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलिसांनी खान मझहर अन्वर खान, खान अस्मा महम्मद मझहर, फिरोज गफार शेख, बाळू भगवान भोपळे, शेख बादशाह आणि शेख लईख मेहमूद या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९(२), महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९८२ चे कलम ३ आणि याच कायद्याचे कलम ५ अन्वये आज (६जून) रोजी सायंकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान  यांची डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिल पदवीही बोगस!

चार नावे का टाळली?

‘खुलताबाद येथे परीक्षेमध्ये सहभागी असलेले केंद्रप्रमुख, केंद्रसंयोजक, सहाय्यक परिवेक्षक आणि बहिस्त परीवेक्षक यांच्याकडे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी स्थापन केलेल्या प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय सत्यशोधन समितीने चौकशी केली. त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात घेतले. खान महमद मजहर अन्वर  आणि खान अस्मा महमद मझहर या दोन्ही परीक्षार्थींनी त्यांचे पेपर फिरोज गफार व बाळू भोपळे यांच्याकडून लिहून घेतले. दुसऱ्याला परीक्षेचा पेपर लिहायला लावणे तसेच दुसऱ्या व्यक्तीचा पेपर लिहिणे हे दोन्ही प्रकार गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याने नियमाचे व कायद्याचे भंग करणारे असल्यामुळे तसेच शेख बादशाह व परीक्षा प्रमुख शेख लईख यांनी सदर प्रकरणी दोषींना सहाकार्य केले असल्यामुळे या सहाजणांवर कायदेशीर पोलिस केस करण्यात यावी, याबाबतची व इतर शिफारशी केल्या….’

हेही वाचाः डीपीयूच्या बोगस एमफिलवरच ‘पेट’ला कट मारून आस्मा व मकसूद खानने घेतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात पीएचडीला प्रवेश!

‘१६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे एम.ए. हिंदी विषयाचे प्रथम सत्राच्या परीक्षेत खान महमद मजहर अन्वर खान व अस्मा महमद मजहर खान या दोन्ही परीक्षार्थ्यांनी त्यांचे पेपर कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक फिरोज गफार शेख व प्रयोगशाळा सहायक बाळू भगवान भोपळे यांच्याकडून लिहून घेतले. दुसऱ्याला पेपर लिहायला लावणे आणि दुसऱ्या व्यक्तीचे पेपर लिहिणे हे दोन्ही प्रकार गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याने नियमाचे व कायद्याचा भंग करणार असल्यामुळे तसेच शेख बादशाह व परीक्षा प्रमुख प्रा. शेख लईख मेहमूद यांनी दोषींना सहकार्य केले आहे. या  आरोपींनी संगनमत करून विद्यापीठाची तसेच शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली असल्यामुळे या सहाजणांवर कायदेशीर गुन्हा दाखल होणेस विनंती आहे.’

हेही वाचाः बोगस पदवी घोटाळाः कोहिनूर महाविद्यालयातील ‘या’ १२ प्राध्यापकांच्या एमफिल, पीएचडी संशयास्पद, अनेकांकडे ‘लापतागंज’ विद्यापीठाच्या पदव्या?

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दिलेल्या या फिर्यादीत केंद्रप्रमुख, केंद्रसंयोजक, सहाय्यक परिवेक्षक आणि बहिस्थ परीवेक्षक एवढ्याच पदांचा उल्लेख आहे. त्यांची नावे देण्यात आलेली नाहीत आणि त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा, असेही फिर्यादीत म्हटलेले नाही. त्यामुळे मुक्त विद्यापीठाने केलेली ही कारवाई ‘सिलेक्टिव्ह’ आहे का? परीक्षेची मूळ जबाबदारी केंद्रप्रमुख, केंद्रसंयोजक, सहाय्यक परिवेक्षक आणि बहिस्थ परीवेक्षकांची असताना त्यांच्या नावाचा उल्लेख का टाळला? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!