देशात कोरोना वाढला, २४ तासांत ६ हजार रुग्ण; हॉटस्पॉट शोधा, चाचण्या वाढवाः केंद्राचे राज्यांना निर्देश


नवी दिल्लीः देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. देशात एका दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत  ६ हजार ५० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गुरूवारच्या तुलनेत रुग्णसंख्येतील ही वाढ तब्बल १३ टक्क्यांनी अधिक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शुक्रवारी तातडीची आढवा बैठक घेतली. कोरोना हॉटस्पॉट शोधा, चाचण्या आणि लसीकरण वाढवा, असे निर्देश मंडाविया यांनी या बैठकीत राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत.

देशातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या शुक्रवारच्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे देशात १४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी महाराष्ट्रातील तीन, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन तर दिल्ली, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दररोजचा पॉझिटिव्हीटी दर ३.३९ टक्के असून देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संक्या २५ हजार ५८७ वर पोहोचली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मंडाविया यांनी कोरोना संसर्गाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मंडाविया यांनी राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि सर्व तयारी ठेवण्याच्या सूचना दिल्या. ८ आणि ९ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांसह आढावा बैठका घेऊन १० आणि ११ एप्रिल रोजी आरोग्य सुविधांचे मॉक ड्रील घेण्याच्या सूचनाही मंडाविया यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!