सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण, पुण्यात सीआयडी मुख्यालयात पत्करली शरणागती


पुणेः बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी मुख्यालयात पोलिसांना शरण आला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मिक कराड गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड फरार होता. शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीयद्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात आहेत. पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यास मी तयार आहे, असे वाल्मिक कराडने या व्हिडीओत म्हटले आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव चर्चेत आले होते. वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचाही आरोप झाला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडमध्ये काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चात वाल्मिक कराड हाच मुख्य टार्गेट होता. वाल्मिक कराडला सरकारमधील कोणाचा वरदहस्त आहे का? त्याला नेमके कोण पाठिशी घालतेय? असे अनेक सवालही उपस्थित केले जात होते. वाल्मिक कराडच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यातील दोन हजारांपेक्षा ग्रामपंचायती बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात वाल्मिक कराडवर थेट आरोप केले होते. अखेर आज वाल्मिक कराडने स्वतःच शरणागती पत्करली आहे.

सीआयडीच्या ९पथकांकडून फरार वाल्मिक कराडचा शोध घेतला जात होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीची ९ पथके आणि १५० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तरीही वाल्मिक कराड सीआयडीसह पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला.

आज पुण्यात पोहोचेपर्यंतही वाल्मिक कराडचा शोध पथकांना सुगावा लागला नव्हता. शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिक कराडने व्हिडीओ प्रसिद्ध केल्यानंतरच तो पुण्यात पोहोचल्याचे सर्वांना समजले. वाल्मिक कराडचे शेवटचे लोकेशन १३ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन ट्रेस झाले होते. तेथे त्याने काढलेल्या फोटो त्याच्यासोबत दोन पोलिसही दिसत आहेत. त्यामुळे पोलिस सोबत असूनही वाल्मिक कराड पोलिसांना कसा सापडत नाही? असे प्रश्न विचारले जाऊ लागले होते.

शरणागतीपूर्वी वाल्मिक कराडने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे की, ‘मी वाल्मिक कराड, केज पोलिस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोषभैय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. राजकीयद्वेषापोटी माझे नाव जोडले जात आहे. पोलिस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी यात दोषी दिसलो तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे,’ असे वाल्मिक कराडने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!