
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राज्य सरकारने जाहीर केलेल्या १०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत येत्या १०० दिवस कालावधीत इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयातच देण्यात येणार आहे,असे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा जातपडातळणी समितीचे सदस्य तथा समाज कल्याण उपायुक्त डॉ. दीपक खरात यांनी कळवले आहे.
इयत्ता ११वी व १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग, एएसईबीसी(मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयातच जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी आपले अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन अर्जाची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयातच जमा करावी. संबंधित महाविद्यालयांनी हे अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावे. समिती शिबिरे आयोजित करुन तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देईल,असे डॉ. खरात यांनी कळवले आहे. या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता समाज कल्याण कार्यालयाचे हेटपाटे मारण्याची गरज भासणार नाही.
