चौकशी समितीने सांगूनही वैष्णवी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने प्राध्यापकांना दिली नाही मूळ कागदपत्रे, विद्यापीठ प्रशासनालाही दाखवला ठेंगा!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  प्रशासकीय अनागोंदी, आर्थिक अनियमितता आणि प्राध्यापक-कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयाचे व्यवस्थापन चौकशीचा बडगा उगारल्यानंतरही सुधारण्याचे नाव घेत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या सदस्यांनी सांगूनही महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना त्यांची मूळ कागदपत्रे अद्यापही देण्यात आली नाही. त्यामुळे वैष्णवी महाविद्यालयाचे व्यवस्थापन विद्यापीठालाही जुमानत नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

बीड जिल्ह्यातील बाहेगव्हाण येथील अण्णासाहेब मस्के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वडवणी येथील वैष्णवी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा प्रचंड आर्थिक व मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारी तेथील आठ प्राध्यापकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे केल्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.

हेही वाचाः ‘…तर तुमचे तुकडेही सापडणार नाहीत,’ संस्थाचालकांनी धमकावले आणि जिवाच्या भितीने प्राध्यापकांनी कॉलेज तोंड पाहणेच सोडले!

डॉ. वायकर चौकशी समितीने १२ मार्च रोजी वैष्णवी महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली. चौकशी समितीत प्राचार्य डॉ. भारत खंदारे आणि प्रा. डॉ. विक्रम खिलारे यांचा समावेश होता. वैष्णवी महाविद्यालयात रसायनशास्त्राचे चार, सुक्ष्मजीवशास्त्राचे दोन, प्राणीशास्त्राचे दोन, वाणिज्य विषयाचे तीन, भौतिकशास्त्र, शारीरिक शिक्षण, इंग्रजी, मराठी, हिंदी विषयाचा प्रत्येकी एक असे एकूण १६ नियमित सहायक प्राध्यापक कार्यरत आहे.

हेही वाचाः वडवणीचे वैष्णवी महाविद्यालय बनले छळ छावणी; प्राध्यापकांना जिवे मारण्याच्या धमक्या देऊन खंडणी वसुली, ‘कॅस’साठीही अडवणूक!

या प्राध्यापकांच्या नियुक्त्यांनंतर त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव महाविद्यालयाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाकडे पाठवण्यात आले. विद्यापीठाने या प्राध्यापकांच्या नियुक्त्यांना मान्यताही दिली. या मान्यतेच्या पत्राच्या दोन प्रती महाविद्यालयाकडे केव्हाच पाठवून देण्यात आल्या. या दोनपैकी एक प्रत महाविद्यालयासाठी तर एक प्रत प्राध्यापकांसाठी असते.

हेही वाचाः वडवणीच्या वैष्णवी महाविद्यालयात अनागोंदी आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट; पण चौकशी समितीनेच केली ‘स्वतंत्र चौकशी समिती’ची अजब शिफारस!

 परंतु महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून या प्राध्यापकांना त्यांच्या पदमान्यता पत्राची मूळ प्रतच देण्यात आली नाही. तसेच ज्या प्राध्यापकांचे कॅस झाले, त्यांच्या कॅसच्या मान्यता पत्राच्या मूळ प्रतीही प्राध्यापकांना देण्यात आल्या नसल्याची या प्राध्यापकांची तक्रार आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून या प्राध्यापकांना त्यांच्या अद्यायावत सेवापुस्तिकेच्या दुय्यम प्रतीही देण्यात आल्या नसल्याचीही प्राध्यापकांची तक्रार आहे.

हेही वाचाः वडवणीच्या वैष्णवी महाविद्यालयात प्राध्यापकांकडून सहसंचालकांच्या नावानेच खंडणी वसुली, तंगडे तोडीच्या धमक्यांमुळे गुरूजी भयभीत!

डॉ. वायकरांच्या चौकशी समितीसमोरही येथील प्राध्यापकांनी हिच तक्रार केली. महाविद्यालयाचे व्यवस्थापन विद्यापीठातून मान्यता आणि कॅसच्या मान्यतेची पत्रे काढून घेते परंतु त्याच्या मूळ प्रती संबंधित प्राध्यापकांना देतच नसल्याचे चौकशी समितीच्याही निदर्शनास आले. चौकशी समितीने संस्थेचे सचिव डॉ. रणजित मस्के आणि प्रभारी प्राचार्य डॉ. श्यामसुंदर गुलभिले यांना संबंधित प्राध्यापकांची मान्यता पत्रे व कॅसच्या मान्यता पत्राच्या मूळ प्रती तसेच अद्ययावत सेवापुस्तिकेच्या दुय्यम प्रती देण्याची सूचना केली. चौकशी समितीसमोर संस्थेचे सचिव डॉ. रणजित मस्के यांनी मान्यता पत्रे तसेच अद्ययावत सेवापुस्तिकेच्या दुय्यम प्रती सर्व प्राध्यापकांना लगेच उपलब्ध करून दिल्या जातील, असे मान्य केले होते.

वैष्णवी महाविद्यालयाला चौकशी समितीने भेट देऊन आजघडीला तब्बल ७७ दिवस उलटले आहेत. तरीही वैष्णवी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गुलभिले किंवा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने संबंधित प्राध्यापकांना ही मूळ कागदपत्रे उपलब्धच करून दिली नाहीत. म्हणजेच चौकशी समितीचा ससेमिरा टाळण्यासाठीच संस्थेचे सचिव डॉ. रणजित मस्के आणि प्रभारी प्राचार्य डॉ. गुलभिले यांनी मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे मान्य केले खरे परंतु  त्यानंतर कोणतीही कृती न करता आम्ही विद्यापीठ प्रशासनालाही जुमानत नाही, असेच प्रभारी प्राचार्य आणि संस्थेच्या सचिवांनी दाखवून दिले आहे.

मृत प्राध्यापकाच्या कुटुंबाचाही छळ

वैष्णवी महाविद्यालयाचे व्यवस्थापन तेथे कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचा जिवंतपणी आर्थिक आणि मानसिक छळ करतेच, परंतु एखाद्या प्राध्यापकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचाही जमेल तेवढा छळ करत असल्याचेही न्यूजटाऊनने केलेल्या झाडाझडतीत उघडकीस आ ले आहे. या महाविद्यालयातील प्राध्यापक भाऊसाहेब दहिवाले यांचा २०२१ मध्ये कोरोना काळात मृत्यू झाला. दहिवाले यांनी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणूनही काम केले आहे.

प्रा. दहिवाले यांच्या मृत्यूनंतर डीसीपीएस अंतर्गत त्यांच्या वारसांसाठी फॅमिली पेन्शनचा प्रस्ताव पाठवण्यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने प्रचंड आढेवेढे घेतले, उडवाउडवीची उत्तरे दिली. सेवापुस्तिका व संबंधित कागदपत्रेही उपलब्ध करून देण्यास प्रचंड विलंब केला. अनेक दिवस प्रा. दहिवाले यांच्या पत्नी महाविद्यालयाचे उंबरठे झिजवत राहिल्या. त्यांनीच हालअपेष्टा सहन करत स्वतःहोऊन ही प्रक्रिया पूर्ण केली. परिणामी प्रा. दहिवाले यांच्या मृत्यूनंतर तब्बल चार-साडेचार वर्षांनंतर म्हणजे यंदाच्या मार्च महिन्यात त्यांच्या वारसांची फॅमिली पेन्शन सुरू झाली. प्रा. दहिवाले यांचे वैद्यकीय देयक अद्यापही प्रलंबितच आहे. या एकूणच प्रकारावरून वैष्णवी महाविद्यालय हे विद्येचे मंदिर नव्हे तर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी छळ छावणीच बनल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!