
मुंबईः केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देऊन टाकले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय नेत्यांबरोबरच कायदेतज्ज्ञही टीका करत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी आर्थिक व्यवहाराचा गंभीर आरोप केला आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्यासाठी आतापर्यंत २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
‘माझी खात्रीची माहिती आहे आहे… चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत… हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे… बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील… देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते…’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत यांनी या ट्विटसोबत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एक कविताही शेअर केली आहे.
‘ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…!
कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली…!’
अशा त्या कवितेच्या ओळी राऊतांनी शेअर केल्या आहेत.
संजय राऊत यांच्या या ट्विटनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राऊतांच्या या दाव्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत आहेत. ‘जे लोक न्याय आणि निर्णय विकत घेतात, त्यांच्याबाबत काय बोलणार? मात्र माझ्यापर्यंत मिळालेली खात्रीलायक माहिती अशी आहे की, दोन हजार कोटींचे डील आत्तापर्यंत झाले आहे. पुरावे लवकरच देऊ. महाराष्ट्राला ते लवकरच समजेल, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
जो पक्ष आणि नेता नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५० लाख आणि १ कोटी रुपये देतो, तो नेता आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी देतो आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतो, त्याने निर्णय विकत घेणे सोपे आहेच. त्या नेत्याने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटींचे डील केले आहे. काही बिल्डरांनी मला ही माहिती दिली आहे, असे राऊत म्हणाले.
किती मोठे डील झाले आहे हे जर समजून घ्यायचे असेल तर १०० ऑडिटर्स लावावे लागतील. जो निर्णय आला आहे, तो न्याय नाही, तो फक्त एक सौदा आहे. चार अक्षरांचे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी हे डील झाले आहे. भारतीय जनता पक्षाला वाटले तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील. यापुढे अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न होतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
