नागपूर: औरंगाबाद महानगरपालिकेचे ‘डॉन’ अशी ख्याती असलेले शहर अभियंता सखाराम पानझडे यांचे फासे आता उलटे फिरल्याचे आज स्पष्ट झाले. पानझडे यांनी केलेल्या सर्वच भानगडींची प्रधान सचिवांमार्फत चौकशी करण्याची घोषणा आज उद्योग मंत्री उद्य सामंत यांनी विधानसभेत केली.
सखाराम पानझडे यांनी स्थापत्य पदविका आधारे नोकरीवरून शासकीय नियमांचे उल्लंघन करत पदोन्नती मिळून शहर अभियंतापर्यंत पदोन्नती मिळवली. पदवीधर अभियंताला डाउनलोड स्थापत्य पदविकाधारक असलेल्या सखाराम धोंडीबा पानझडे यांना पदोन्नती देणे, तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर गैरमार्गाने करार पद्धतीवर स्वतःची नेमणूक करून घेणे, शासन निर्णय अंमलबजावणी करण्याऐवजी उल्लंघन करणे, याबाबत प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी केली जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली
या समितीवर सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.
सोनिया सेठी कशी चौकशी करणार?: सखाराम पानझडे यांच्या बाबत नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्याकडे आधीच तक्रारी करण्यात आल्या होत्या. सेवानिवृत्तीनंतरही पानझडे यांना करार पद्धतीवर देण्यात आलेल्या नेमणुकीची मुदत संपल्यानंतरही पानझडे पाच-सहा महिने या पदावर कसे काय कार्यरत आहेत? याबाबतच्या तक्रारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्याकडे यापूर्वीच करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारींवर त्यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे सामंतांच्या या घोषणेतून नेमके काय फलित निघेल? अशी शंकाही आता घेतली जाऊ लागली आहे.