बोगस पदवी घोटाळाः डॉ. शंकर अंभोरेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने हर्सूल तुरुंगातील मुक्काम लांबला; मझहर व आस्मा खान ‘पाहुणचारा’साठी यूपी पोलिसांच्या ताब्यात!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बोगस पदवी घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मान्यता रद्द केलेले कोहिनूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरेंचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे प्रा. डॉ. शंकर अंभोरेंचा हर्सूल तुरुंगातील मुक्काम लांबला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या. एस. बी. पाटील याच गुन्ह्यात अन्य एक आरोपी शेख मोहम्मद हाफीज उर रहेमानचाही जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आस्मा इद्रिस खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान या दोघांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची बनावट व खोट्या एम.फिल. पदवीच्या आधारे पेटमधून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश घेतल्याप्रकरणी आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या बनावट व खोट्या पदव्यांच्या आधारे कोहिनूर महाविद्यालयात शेख मोहम्मद हाफीज उर रहेमान याला पूर्णवेळ सहशिक्षकपदी नियुक्त केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात २६ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचाः ‘स्वाभिमाना’चा चुथडा: मराठी लिहिता-वाचताही न येणाऱ्याला बोगस पदव्यांच्या आधारे अध्यापकाची नियुक्ती दिल्याप्रकरणी प्रा. डॉ. शंकर अंभोरे गजाआड

या गुन्ह्यात पोलिसांनी प्रा. डॉ. शंकर अंभोरेंना १९ एप्रिल रोजी अटक केली होती. २० एप्रिल रोजी न्यायालयाने अंभोरेंना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर काल २३ एप्रिल रोजी पोलिसांनी अंभोरेंना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे कालच प्रा. डॉ. अंभोरेंची रवानगी हर्सूल तुरुंगात करण्यात आली होती.

हेही वाचाः बोगस पदवी घोटाळा प्रकरणी प्रा. डॉ. शंकर अंभोरेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे प्रा. डॉ. अंभोरेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. आज दुपारी या जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. एस. बी. पाटील यांनी प्रा. डॉ. अंभोरेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याच गुन्ह्यातील अन्य एक आरोपी शेख मोहम्मद हाफीज उर रहेमानचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे प्रा. डॉ. अंभोरेंचा हर्सूल तुरुंगातील मुक्काम लांबणीवर पडला आहे.  याच गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी आस्मा इद्रिस खान आणि डॉ. मझहर खान हेही न्यायालयीन कोठडीत हर्सूल तुरुंगातच आहेत.

हेही वाचाः कोहिनूरचा ‘नूर’ बदललाः बोगस पदवी घोटाळ्याचा तपास अचानक सहायक पोलिस आयुक्तांकडून काढला, आता तपास करणार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक!

आस्मा व मझहर खान यूपी पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, उत्तर प्रदेशातील वीर बहादूरसिंग पूर्वांचल विद्यापीठाची एल. एल. बी. ची बोगस पदवी तयार केल्याप्रकरणी डॉ. मझहर खान व आस्मा खान या दोघांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील जौनपूर येथेही गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याच्या तपासासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) दाखल झाले होते.  या दोघांचा ताबा मिळवण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पोलिसांशी संपर्क साधला.

हेही वाचाः बोगस पदवी घोटाळ्याचा तपास एसीपींकडून काढून पीआयकडे दिल्यामुळे सरकार व गृह खात्याची बदनामी  होत असल्याचे सांगत एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या पथकाने आस्मा खान व मझहर खानचा ताबा घेतला आणि या दोघांना घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक जौनपुरला रवाना झाले आहे. आता छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पोलिसांचा ‘पाहुणचार’ घेऊन झाल्यानंतर या दोघांना आता उत्तर प्रदेश पोलिसांचाही ‘पाहुणचार’ मिळणार आहे.

हेही वाचाः बोगस पदवी घोटाळाः कोहिनूर महाविद्यालयातील ‘या’ १२ प्राध्यापकांच्या एमफिल, पीएचडी संशयास्पद, अनेकांकडे ‘लापतागंज’ विद्यापीठाच्या पदव्या?

‘कोहिनूर’च्या झडतीत सापडली अनेक बनावट कागदपत्रे

दरम्यान, प्रा. डॉ. अंभोरेंना अटक केल्यानंतर पोलिसांनी अंभोरेंचे पेठेनगरातील राहते घर तसेच खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयातील कार्यालयाची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत अंभोरेंच्या घरी काहीही आढळून आले नाही. मात्र कोहिनूर महाविद्यालयात अनेक बनावट व खोटी कागदपत्रे हाती लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी या महाविद्यालयातील अंभोरेंच्या कार्यालयातून संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. झडतीदरम्यान मिळालेल्या कागदपत्रांमध्ये विविध विषयातील बनावट गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. या कागदपत्रांची निर्मिती कोठे व कशा प्रकारे झाली याचा आता पोलिस शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!