
रियाधः या वर्षीच्या हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया सरकारने मोठा निर्णय घेतला असून भारत आणि पाकिस्तानसह १४ जेशांच्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी घातली आहे. उमरा, व्यवसाय आणि कौटुंबिक व्हिसावर ही बंदी लागू रहाणार आहे. जूनपर्यंत हे निर्बंध कायम रहातील. ज्यांच्याकडे उमरा व्हिसा आहे ते १३ एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकणार नाहीत, असे सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्यावर्षी हज यात्रेमध्ये उष्णतेमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे अनिवार्य असल्यामुळे यंदाच्या हज यात्रेनिमित्त होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि योग्य नोंदणी केल्याशिवाय देशात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना रोखण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
२०२४ च्या हज यात्रेमध्ये तीव्र उष्णतेमुळे अनेक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. हज यात्रेला जमलेल्या गर्दीपैकी अनेक यात्रेकरूंनी नोंदणीच केलेली नव्हती, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे यंदाच्या हज यात्रेत अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी दिले आहेत. त्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने ज्या १४ देशांच्या व्हिसावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे, त्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया, येमेन इत्यादी देशांचा समावेश आहे.
