
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान हाच बनावट पदव्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्याही पदव्या तपासणीसाठी मागवून घेतल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासातून बनावट पदव्या विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
डॉ. मझहर खान याची पत्नी आस्मा इद्रिस खान आणि भाऊ पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान या दोघांनी पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून तयार केलेल्या बनावट व खोट्या एम. फिल. पदवीच्या आधारे २०२१ मध्ये पेट परीक्षेतून सूट मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी.ला प्रवेश मिळवला होता. या प्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विजय मोरे यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिसांनी २६ मार्च रोजी गुन्हा नोंदवला होता.
गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी आस्मा इद्रिस खान हिला ३० मार्च रोजी अटक केली होती. आस्मा इद्रिस खान हिच्या चौकशीत या संपूर्ण बनावट पदव्या प्रकरणाचा मास्टरमाइंड डॉ. मझहर खान हाच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी रविवारी पहाटे डॉ. मझहर खानला फुलंब्री तालुक्यातील महाल किन्होळा या त्याच्या गावातून अटक केली. त्याला न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस आता त्याची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीत त्याच्याकडून बनावट पदव्यांच्या रॅकेटची मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
आस्मा खान हिच्या चौकशीत बनावट पदव्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. तसेच या बनावट पदव्या प्रकरणाचा मास्टरमाइंड मझहर खान हाच असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाकडे वळवला असून तेथे कार्यरत असलेल्या सर्वच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या पदव्या तपासासाठी मागवून घेतल्या आहेत. या पदव्यांच्या झाडाझडतीत काही प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या पदव्याही बनावट आढळून येतात की काय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे शेख मोहम्मद हफीझ उर रहेमान मोहम्मद मोईजुद्दीन याने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून तयार केलेल्या बनावट पदव्यांच्या आधारेच कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी व मानसशास्त्र विषयाचा सहशिक्षकपदावर नोकरी मिळवल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यापार्श्वभूमीवर कोहिनूर महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या पदव्यांच्या तपासणीत आणखी काहीजणांची बोगसगिरी उघडकीस येण्याची शक्यता आहे.
बनावट पदव्याच पदव्या!
डॉ. मझहर खानने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील विविध विद्यापीठाच्या बनावट पदव्या तयार केल्या आहेत. पुण्याचे डॉ. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ या महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांची नावे आतापर्यंत समोर आली आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील वीर बहादूरसिंह विश्वविद्यालयाची एलएलबीची बनावट पदवी तयार केल्याप्रकरणी जौनपूर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे.
कर्नाटकच्या बेंगळुरू येथील राजीव गांधी हेल्थ सायसेन्स विद्यापीठाची बनावट बीएचएमएसची पदवी तयार केल्याप्रकरणी बेंगळुरूच्या टिळकनगर पोलिसांत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून २६ फेब्रुवारी रोजी त्याला याच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आता बनावट पदवी तयार केल्याच्या तिसऱ्या गुन्ह्यात मझहर खान गजाआड गेला आहे.

