ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, ‘मेरे देश की धरती सोना उगले’ म्हणत हिंदी चित्रपटांतून देशभक्तीची पेरणी करणारा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड


मुंबईः हिंदी चित्रपटांमधून देशभक्तीची पेरणी करणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मनोज कुमार हे ‘उपकार’, ‘क्रांती’सारख्या देशभक्तीपर चित्रपटांसाठीच ओळखले जातात. त्यामुळे त्यांना ‘भारत कुमार’ म्हणूनही ओळखले जाई. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांतील गाणी आजही गुणगुणली जातात.  त्यांच्या ‘उपकार’या चित्रपटातील ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती… मेरे देश की धरती’ या गाण्याशिवाय आजही स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन साजरेच होत नाहीत.

मनोज कुमार यांचे अनेक चित्रपट देशभक्तीचे महत्व सांगणारे होते. त्यामुळेच लोकांनी त्यांना ‘भारत कुमार’ हे टोपणनाव दिले होते. मनोज कुमार यांनाही हे टोपणनाव खूप आवडले होते आणि त्यांनी ते आयुष्यभर मिरवलेही होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी चित्रपटात काम करणे बंद केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे होते. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी ब्रिटिश भारतातील वायव्य प्रांतातील आबोटाबादमधील एका पंजाबी हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. सध्या हा भाग पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामध्ये येतो. मनोज कुमार हे १० वर्षांचे असताना देशाची फाळणी झाली आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीला स्थलांतरित झाले. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अशोक कुमार, दिलीप कुमार यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी आपले हरिकृष्ण हे नाव बदलून मनोज कुमार ठेवले होते.

मनोज कुमार यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास फॅशन ब्रँड (१९५७) या चित्रपटापासून सुरू झाला. त्यानंतर त्यांनी सहारा (१९५८), चांद (१९५९) आणि हनीमून (१९६०) या चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. पण या चित्रपटातील त्यांच्या भूमिका किरकोळ होत्या.

१९६१ मध्ये आलेला ‘कांच की गुडियां’ हा मनोज कुमार यांची मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट. याच वर्षी त्यांचे पिया मिलन की आस, सुहाग सिंदूर आणि रेशमी रुमाल हे त्यांचे चित्रपट आले, परंतु ते फारसा प्रभाव दाखवण्यात अपयशी ठरले.

१९६२ मध्ये पडद्यावर आलेला आणि विजय भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटाने त्यांना खरी ओळख दिली. या चित्रपटात मनोज कुमार यांच्यासोबत माला सिन्हा यांनी भूमिका केली होती. या चित्रपटाच्या व्यावसायिक यशाने त्यांना हरहुन्नरी मुख्य अभिनेता म्हणून ओळख दिली आणि त्यानंतर शादी (१९६२), डॉ. विद्या (१९६२) आणि ग्रहस्ती (१९६३) यासारख्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटांसाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला.

मनोज कुमार यांचे खरे स्टारडम झळकले ते १९६४ मध्ये रिलिज झालेल्या राज खोसला यांच्या ‘वह कौन थी?’ या मानसशास्त्रीय थ्रिलर चित्रपटामुळे. हा चित्रपट सुपरहिट ठरला तो रंजक कथा आणि मदन मोहन यांच्या दिलखेच संगीतामुळे. या चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायलेली ‘लग जा गले’, ‘नैना बरसे रिमझिम’ ही गाणी लोकांच्या आजही ओठावर आहेत.

१९६५ मध्ये मनोज कुमार यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरला कलाटणी मिळाली.  भगतसिंग यांच्या क्रांतीकारी जीवनावर बेतलेल्या ‘शहीद’ या देभक्तीपर चित्रपटात त्यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली. या चित्रपटाची तत्कालीन प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी तोंडभर प्रसंशा केली होती. या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता तर मिळवलीच शिवाय व्यावसायिक यशही मिळवले.

त्यानंतर आलेला मनोज कुमार यांचा हिमालय की गोदी में या चित्रपट ब्लॉकबुस्टर ठरला. त्यानंतर आलेले गुमनाम, उपकार (१९६७), पूरब और पश्चिम (१९७०), क्रांती (१९८१) या चित्रपटांनी मनोज कुमार यांचा कारकीर्दीला नवी झळाळी दिली. या चित्रपटांनी त्यांची भारतीय सिनेमातील देशक्तीचे प्रतिक म्हणून त्यांची प्रतिमा आणखीच भक्कम केली.

शोर (१९७२) या चित्रपटातील ‘एक प्यार का नगमा है…मौजो की रवानी है’ हे अवीट गाणे आजही गुणगुणले जाते. १९९५ मध्ये आलेला ‘मैदान ए जंग’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!