राज्यात १ मेपासून लागू होणार ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ प्रणाली, कोणत्याही शहरात घेतलेल्या घराची कोणत्याही शहरात करता येणार नोंदणी!


मुंबईः  राज्याच्या महसूल विभागाकडून १ मे २०२५ पासून वन स्टेट- वन रजिस्ट्रेशन, फेसलेस नोंदणी व मुंद्राक नोंदणी प्रणाली लागू करण्यात येणार असून या प्रणालीमुळे तुम्ही राज्यातील कोणत्याही शहरात घर घेत असाल तर त्याची नोंदणी कोणत्याही शहरातून करू शकता. म्हणजेच तुम्ही जर नागपूर शहरात घर घेत असाल तरी तुम्हा पुण्यातूनच त्या घराची नोंदणी करता येऊ शकेल. या प्रणालीत आधारकार्ड आणि इन्कम टॅक्स प्रमाणपत्राच्या आधारे तुमचा चेहरा नोंदणीसाठी वापरण्याची सुविधा मिळणार आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या निर्णयामुळे भ्रष्टाचार कमी होईल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि डिजिटल प्रक्रियेमुळे महसूल व्यवहार अधिक पारदर्शक होतील, असे बावनकुळे म्हणाले. डिजिटल महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प असून आम्ही त्यावर काम करत आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.

हे डिजिटल युग आहे. त्यामुळे मालमत्तांची नोंदणीही अपग्रेड करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच १ मे २०२५ पासून राज्यात वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन प्रणाली सुरू करत आहोत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

या नव्या प्रणालीविषयी महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुण्यात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीने नागपुरात घर खरेदी केले तर त्याला त्या मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी सध्या नागपुरात जावे लागते. त्यामुळे त्या व्यक्तीचा वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होतात. परंतु १ मेपासून असे होणार नाही. नागपुरात घेतलेल्या घराची नोंदणी पुण्यातूनच करता येणार आहे.

वन स्टेट वन रजिस्ट्रेशन प्रणालीचा मुख्य उद्देशच मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुलभ करणे आणि नोंदणीच्या प्रक्रियेतील दक्षतेमध्ये सुधारणा करणे हा आहे. या नव्या प्रणालीमुळे लोकांचा वेळ आणि पैसाही वाचेल, असे महसूल विभागातील हा अधिकारी म्हणाला.

सरकारच्या या नव्या प्रणालीचे मालमत्ता विश्लेषकांनी स्वागत केले आहे. नव्या प्रणालीमुळे मालमत्ता खरेदीदारांच्या अडचणी कमी होतील आणि मुद्रांक नोंदणी कार्यालयातील अनावश्यक गर्दीही कमी होईल, असे मालमत्ता विश्लेषकांचे म्हणणे आहे. परंतु या प्रणालीचा दुरूपयोग रोखण्यासाठी कठोर तपासणी आणि पडताळणीची आवश्यकता असल्याचेही या विश्लेषकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!