गडचिरोलीतील राईस मिल अपव्यवहार प्रकरणातील दोषींना ‘मकोका’ लावणार, दंड न भरल्यामुळे सरकार उचलणार कठोर पावले


मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिलधारकांनी शासनाची फसवणूक केली आहे. अपव्यवहार करणाऱ्या राईस मिलधारकांवुर्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून या प्रकरणातील दोषींविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी बुधवारी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

शासनाची फसवणूक करून अपव्यवहार करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिलधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. काहींवर दोन कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असला तरी, अद्याप तो भरलेला नाही. त्यामुळे संबंधितांविरुद्ध आणखी कठोर पावले उचलली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाऊन काही प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी असल्याचे निदर्शनास आल्यास, मकोका (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा विचार केला जाईल, असेही कदम यांनी सांगितले.

गरीब आणि गरजू कुटुंबांना मिळणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात कसलीही कुचराई सहन केली जाणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही कदम म्हणाले.

यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात येणार असून त्यात संबंधित प्रकरणांवर सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, ॲड. अनिल परब, परिणय फुके, भाई जगताप आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या लक्षवेधी सूचनेमध्ये सहभाग घेतला.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!