‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकरांची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल; ह्रदयात झाली रक्ताची गुठळी


पुणेः वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली असून छातीत दुखू लागल्यामुळे आज पहाटे त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात पत्रक काढून अधिकृत माहिती दिली आहे.

गुरूवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या ह्रदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून येत्या त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीने पत्रकात म्हटले आहे.

आंबेडकर कुटुंब सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे आंबेडकर कुटुंबाने विनंती केली आहे की, कुणीही प्रश्न विचारून व्यत्यत आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, असे वंचित बहुजन आघाडीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 पुढील तीन ते पाच दिवस प्रकाश आंबेडकर हे डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहिरनामा समिती आणि माध्यम व संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!