‘लाडक्या बहिणीं’च्या ओवाळणीची भाचा-भाचींकडून व्याजासह वसुली, दहावीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ; चुकांचा भूर्दंडही माथी!


मुंबईः ऐनविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू असतानाच या योजनेसाठी अन्य योजनांचे पैसे वळवल्याचा आरोपही केला जात आहे. अशातच आता महायुती सरकारने ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा सुरू केलेल्या ओवाळणीची वसुली भाचा-भाचींकडून केली जात असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एसएससी) म्हणजेच इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ केली आहे. एसएससी परीक्षा देणाऱ्या नियमित व खासगी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क ४७० रुपये करण्यात आले आहे. या मूळ शुल्का व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना २० रुपये प्रशासकीय शुल्क, २० रुपये गुणपत्रिका शुल्क, २० रुपये प्रमाणपत्र शुल्क प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषयासाठी १० रुपये आणि तंत्र विषयासाठी १०० रुपये) द्यावे लागणार आहे. म्हणजेच शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना ५४० रुपये आणि तंत्रविषयाच्या विद्यार्थ्यांना ६३० रुपये एकूण परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. आधी हे परीक्षा शुल्क ३७५ रुपये होते.

एसएससी परीक्षेत कमी गुण पडल्यामुळे श्रेणी सुधार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशातही बोर्डाने चांगलाच हात घातला आहे. श्रेणी सुधार करणाऱ्या शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना ९८० रुपये तर तंत्र विषयाच्या विद्यार्थ्यांना १०७० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे एकीकडे लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये ओवाळणी देऊन राज्य सरकार भाचा-भाचींच्या खिशातून वसुली करत आहे की काय?  असा सवाल केला जात आहे.

हा भूर्दंड विद्यार्थ्यांच्या माथी कशासाठी?

एसएससी आणि एचएससी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने भरून घेतली जाणार आहेत. ही आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरून संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फतच भरावयाची आहेत तरीही ही आवेदनपत्रे भरताना झालेल्या चुकांच्या दुरूस्तीचा भूर्दंड मात्र विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आला असून या भूर्दंडाच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

नावातील दुरूस्ती (फक्त नाव, वडिलांचे नाव, आडनाव यापैकी काहीही एक) करण्याचे शुल्क वाढवून प्रतिदुरूस्ती २०० रुपये करण्यात आले आहे. संपूर्ण नावातील आणि आईच्या नावातील दुरूस्तीचे शुल्कही प्रतिविद्यार्थी २०० रुपये करण्यात आले आहे.

आवेदनपत्रातील प्रत्येक दुरूस्तीसाठीचे (विषय/माध्यम वगळून) शुल्कही प्रतिविद्यार्थी २०० रुपये करण्यात आले आहे. संपूर्ण विषयांच्या माध्यमांच्या दुरूस्तीचे शुल्क प्रतिविद्यार्थी १ हजार रुपये करण्यात आले आहे. गुणपत्रिकेतील प्रत्येक दुरूस्तीसाठीच्या (विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक, जन्म ठिकाण, आईचे नाव यातील कोणत्याही दुरूस्तीसाठी) शुल्कातही वाढ करण्यात आली असून हे शुल्क प्रतिचूक २०० रुपये करण्यात आले आहे.

परीक्षेची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरून शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखाकडूनच भरायची असतील तर त्या आवेदनपत्रात होणाऱ्या चुकांसाठी त्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांना जबाबदार धरण्याऐवजी त्या चुकांसाठीचा भूर्दंड विद्यार्थ्यांच्या माथी कशासाठी?, असा सवाल विद्यार्थी/पालकांकडून केला जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!